‘शिवसेना वाढवली, स्वतःला संपवले’; झालेल्या अन्यायाच्या विरोधात महानगरप्रमुख व नगरसेवक पदाचा राजीनामा देणार प्रविण तिदमे‌

शाखा प्रमुख म्हणून गल्लीतून सुरुवात करून महानगरप्रमुख पदापर्यंतचा प्रवास हा पदासाठी नव्हे, तर शिवसेना वाढीसाठी होता. विधानसभा-लोकसभा निवडणुकांत उमेदवार कोणताही असो, शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेऊन लढाई पुढे नेणाऱ्यांपैकी ते अग्रभागी होते.

महानगरप्रमुख असताना नाशिक शहरासाठी ३०० कोटींहून अधिक विकासकामे नगरविकास निधीतून मार्गी लागली. केवळ स्वतःचा प्रभाग नव्हे, तर इतर नगरसेवकांच्या प्रभागांसाठीही निधी मिळावा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. नगरविकास निधी काय असतो, हे नाशिकला त्यांच्याच काळात कळले, असा थेट टोला त्यांनी लगावला.

मात्र आज परिस्थिती उलट असल्याचा आरोप करत तिदमे म्हणाले की, “एक वर्षे निगोसिएशन करून पक्षात आलेल्या अजय बोरस्ते यांना एकाच वेळी चार-चार महत्त्वाची पदे दिली जातात, तर रस्त्यावरून संघटना उभी करणाऱ्यांना डावलले जाते.” जिल्हा प्रमुख, उपनेते, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे पद आणि महापालिका गटनेतेपद एकाच व्यक्तीकडे देऊन पक्षात संभ्रम निर्माण केला गेला. सोशल मीडियावर व मीडियातून महानगरप्रमुख बदलाच्या अफवा पसरवून संघटन थांबवण्याचा प्रयत्न झाला, तरीही पक्ष नेतृत्वाने डोळेझाक केल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणे, दीड-दोन वर्षांपूर्वी पक्षात आलेल्या विलास शिंदे यांना सह-संपर्कप्रमुख आणि थेट उपमहापौर पद देण्यात आल्याने संघर्षशील शिवसैनिकांच्या तोंडावर तमाचा मारल्यासारखी अवस्था झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

“एकीकडे निष्ठावंत शिवसैनिकांचा अपमान आणि दुसरीकडे सौदेबाजांना पदांची खैरात— हा अन्याय आता सहन होण्यापलीकडे गेला आहे,” असे स्पष्ट करत प्रविण (बंटी) तिदमे यांनी सोमवारी शिवसेना नाशिक महानगरप्रमुख पदाचा राजीनामा मा. एकनाथजी शिंदे व खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे सादर करणार असल्याचे जाहीर केले. तसेच दुपारी ४.३० वाजता नगरसेवक पदाचा राजीनामा महापालिका आयुक्तांकडे देण्यात येणार आहे.

या राजीनाम्यामुळे शिवसेना शिंदे गटातील नाशिक शहरातील अंतर्गत असंतोष उघडपणे समोर आला असून, येत्या काळात पक्ष नेतृत्वाची भूमिका काय असते, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!