१ एप्रिल २०२६ पासून टीडीएस कपात होणार नाही; सीए डॉ. दिलीप सातभाई
नाशिक (प्रतिनिधी):मोटार अपघात प्रकरणात न्यायालयीन प्रक्रियेमुळे उशिरा मिळणाऱ्या नुकसान भरपाई रकमेवर दिले जाणारे व्याज आता करमुक्त असणार असून, त्यावर कोणतीही टीडीएस कपात केली जाणार नाही. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात याबाबत महत्त्वपूर्ण सुधारणा प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती पुणे येथील प्रख्यात सनदी लेखापाल (सीए) डॉ. दिलीप सातभाई यांनी दिली.
मोटार अपघातातील मृत व्यक्तीच्या वारसांना मिळणारी नुकसान भरपाई अनेक वेळा न्यायालयीन प्रक्रियेमुळे वर्षानुवर्षे प्रलंबित राहते. या विलंबामुळे मूळ विमा रकमेबरोबरच व्याजही दिले जाते. आतापर्यंत या व्याजाच्या रकमेवर टीडीएस कपात केली जात होती. मात्र, नव्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार १ एप्रिल २०२६ पासून मोटार अपघात नुकसान भरपाईवरील व्याज पूर्णतः करमुक्त राहणार असून टीडीएस कपात होणार नाही, असे डॉ. सातभाई यांनी स्पष्ट केले. नर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, मालेगाव टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन व अहिल्यानगर टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अर्थसंकल्पीय वेबिनारमध्ये ते बोलत होते.
यावेळी डॉ. सातभाई यांनी प्राप्तिकर कायद्यातील इतर महत्त्वपूर्ण बदलांची माहिती देताना सांगितले की, प्राप्तिकर कायदा २०२५ अंतर्गत आयकर विवरणपत्र भरण्याच्या प्रक्रियेत करदात्यांना दिलासा देणारे बदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. यामुळे करदात्यांवरील अनुपालनाचा ताण कमी होणार असून अंतिम तारखांमध्ये सुसूत्रता येणार आहे.
सुधारित आयकर विवरणपत्र दाखल करण्याची मुदत ९ महिन्यांवरून १२ महिने करण्याचा प्रस्ताव असून, आता विवरणपत्र ३१ डिसेंबरऐवजी ३१ मार्चपर्यंत दाखल करता येणार आहे. तसेच टीसीएस संदर्भातील बदलांबाबत परदेशातील शिक्षण व वैद्यकीय उपचारांसाठी होणाऱ्या खर्चावरील टीसीएस दर सध्याच्या ५ टक्क्यांवरून २ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन डोंगरे यांनी अर्थसंकल्प २०२६ मधील प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करांबाबतचे बदल कर सल्लागारांना सोप्या भाषेत समजावेत, या उद्देशाने वेबिनारचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.
कार्यक्रमात प्रमुख वक्त्यांचा परिचय सागर यांनी करून दिला. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सौ. विशाखा भामरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सतीश कजवाडकर, अनिल चव्हाण, योगेश कातकाडे, आदींनी परिश्रम घेतले.
