देशी गोवंश संवर्धनाच्या कार्याला राज्यस्तरीय मान्यता
नाशिक (प्रतिनीधी) : देशी गोवंश संवर्धन, गोसंरक्षण व गोसेवा क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यपूर्ण, निस्वार्थ आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या इगतपुरी तालुक्यातील नांदडगाव येथील गोकुळधाम गोसेवा प्रतिष्ठान यांना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गोसेवा आयोग, पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजना 2025–26 अंतर्गत जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित भव्य सन्मान सोहळ्यात या संस्थेस श्रेष्ठ राजदूत म्हणून गौरविण्यात आले. हा मानाचा पुरस्कार मा. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, सचिव डॉ. शामकांत प्रभाकर पाटील, आयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. प्रविणकुमार देवरे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोकुळधाम गोसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनकर शांताराम खातळे व उपाध्यक्ष शरद हरिभाऊ फडोळ यांना महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. देशी गोवंशाचे संगोपन, शुद्ध देशी गायींचे संवर्धन, गोमातांच्या आरोग्याची शास्त्रीय पद्धतीने काळजी, तसेच गोसेवेविषयी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी संस्थेने केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. गोकुळधाम गोसेवा प्रतिष्ठानमध्ये देशी गायींचे संगोपन करताना नैसर्गिक व पारंपरिक पद्धतींचा अवलंब केला जातो. गोमातेच्या आरोग्यासोबतच गोमूत्र, गोमय यांचा कृषी व पर्यावरणपूरक वापर, तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्यही संस्था करत आहे. त्यामुळे गोसंवर्धनाबरोबरच पर्यावरण संरक्षण व शाश्वत शेतीला चालना मिळत आहे. सन्मान सोहळ्यात बोलताना मान्यवरांनी, देशी गोवंशाचे जतन व संवर्धन हे केवळ धार्मिक नव्हे तर आर्थिक, पर्यावरणीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. गोकुळधाम गोसेवा प्रतिष्ठानसारख्या संस्था समाजासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्यामुळे भावी पिढ्यांपर्यंत गोसेवेचे महत्त्व पोहोचत असल्याचे गौरवोद्गार काढण्यात आले.
सन्मान स्वीकारताना गोकुळधाम गोसेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी, हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कार्याची जबाबदारी अधिक वाढवणारा असल्याची भावना व्यक्त केली. भविष्यात देशी गोवंश संवर्धनासाठी अधिक व्यापक स्वरूपात कार्य करत, शेतकरी, युवक व महिला यांना गोआधारित उपक्रमांशी जोडण्याचा संकल्प त्यांनी यावेळी जाहीर केला. या राज्यस्तरीय सन्मानामुळे नांदडगावसह संपूर्ण इगतपुरी तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थ, गोप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते व विविध संस्थांकडून गोकुळधाम गोसेवा प्रतिष्ठानचे अभिनंदन करण्यात येत आहे. या सन्मानामुळे तालुक्याच्या नावलौकिकात भर पडली असून, गोसेवा क्षेत्रातील इतर संस्थांनाही प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
