पंधरा दिवसांपूर्वी शंभर फूट रस्त्यावर असलेल्या एका खचलेल्या चेंबरमध्ये दुचाकी अडकल्याने दुचाकीस्वार महिलेचा भीषण अपघात झाला. या अपघातात सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे, हा रस्ता वर्दळीचा असून याठिकाणी यापूर्वीही अनेकदा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या घटनेनंतर वडाळागाव युवा मंचच्या वतीने मनपाच्या बांधकाम विभागाकडे लेखी तक्रार करून तातडीने दुरुस्ती व सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाने ही तक्रार प्रलंबित ठेवत कोणतीही ठोस कारवाई केली नाही. खचलेले चेंबर तसेच राहिल्याने आजही नागरिकांच्या जीवितास धोका कायम आहे.
मनपाच्या या बेजबाबदार भूमिकेविरोधात वडाळागाव युवा मंचने आज शांततामय मार्ग अवलंबत गांधीगिरी पद्धतीने निषेध आंदोलन केले. “नागरिकांचा जीव महत्त्वाचा नाही का?”, “अपघातानंतरही मनपा झोपेत?” अशा घोषणा देत प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र शब्दांत टीका करण्यात आली.
या वेळी आंदोलकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करावी, खचलेली चेंबर्स तात्काळ दुरुस्त करावीत तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संपूर्ण परिसरातील रस्ते व ड्रेनेजची तपासणी करून कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी ठाम मागणी केली. याआंदोलनात रमिज पठाण, ईश्वर पवार, विवेक देशमुख, तुषार भगत, सोनू आहेर यांच्यासह वडाळागाव युवा मंचचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
