नवीन नाशिक (प्रतिनिधी) : परिसरात गॅस पाइपलाइनचे काम पूर्ण होऊन काही ठिकाणी कनेक्शन देण्यात आले आहेत. मात्र गॅसची लाइन लिक होण्याचे प्रकार घडत असल्याने नागरिकांना धडकी भरली आहे. पंधरा दिवसात दोन वेळा गॅस पाइप लाइन लिकेजची घटना घडली. शनिवारी (दि. ८) रात्री खोडे मळा परिसरात गॅस लाइन लिकेज झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
अंबड भागातील फडोळा मळा येथे एका सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गॅस पाइपलाइन लिकेज होण्याचा प्रकार गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच घडला होता. असाच प्रकार जुने सिडको येथील खोडे मळा परिसरात शनिवारी घडला. परिसरात खासगी एमएनजीएल गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. गॅस पाइपलाइन टाकण्याचे बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही अनेक नागरिकांच्या घरांमध्ये थेट गॅस पाइपलाइन देण्यात आलेली नाही. परंतु कंपनीच्या माध्यमातून टाकण्यात आलेल्या गॅस पाइपलाइनमध्ये गॅस भरण्यात आलेला आहे. नागरिकांना कनेक्शन देण्यासाठी काही ठिकाणी गॅस लाइनवर झाकण लावून सोडून देण्यात आली आहे. जुने सिडको खोडे मळा या ठिकाणी अशाच प्रकारे गॅस लाइन एका सोसायटीच्या इमारतीला गॅस देण्यासाठी काढून ठेवण्यात आलेली आहे. मात्र सदरचे पाइपलाइन असलेल्या गॅसवर वाहन जाऊन लाइन लिकेज झाल्याचा प्रकार शनिवारी रात्रीच्या सुमारास घडला. याबाबत माहिती संबंधित अधिका-यांना देण्यात आल्यावर तासाभरानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी लाइन बंद केली.