दिलासादायी: नाशिक जिल्ह्यातील धरणे भरली!

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील सर्व २४ धरणांतील जलसाठा ९८ टक्के झाला असून बहुतांश धरणांतून वेळोवेळी विसर्गही येत आहे. नाशिक जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे नांदुरमध्यमेश्वर बंधा-यातून जायकवाडीसाठी जवळपास ५० टीएमसी पाणी सोडले गेले आहे. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सहन करणा-या मराठवाड्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिक जिल्ह्यात यंदा जूनच्या प्रारंभीच हजेरी लावत आनंद वार्ता देणाºया पावसाने नंतरच्या काळात विश्रांती घेत बळीराज्यासह सर्वांचीच चिंता वाढवली होती. जुलैच्या शेवटच्या टप्यात आणि नंतर ऑगस्ट महिन्यात मात्र मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापुर धरण समुहासह अन्य धरणांचा जलसाठा उंचावला. संततधार पावसामुळे यंदा गोदावरीला तीन वेळा पूर परिस्थितीचाही सामना करावा लागला. शहरातील गंगापूर, दारणा आणि पालखेड समुहातील धरणांचे पाणी नांदूरमध्यमेश्वरमार्गे गोदावरी नदीतून मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकडे जाते. यंदा वरच्या भागात चांगला पाऊस झाल्यामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. एकट्या नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्याकडे ४९ हजार ७६७ दशलक्ष घनफूट म्हणजे जवळपास ५० टीएमसी पाणी सोडल्याची आकडेवारी आहे. या पाण्यातच जायकवाडी धरण जवळपास निम्मे भरले आहे.
गेल्या चार, पाच दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने मुक्काम ठोकला आहे. कधी विजांच्या कडकडाटात तर कधी संततधार होत आहे. गुरुवारपासून पावसाचा जोर वाढला. शहरातील रस्ते व चौकात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. तात्पुरत्या स्वरुपात बुजविलेले खड्डे पुन्हा उघडे पडल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली आहेत.
जाहिरातीसाठी संपर्क: 9922900815

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!