नवीन नाशिक : नवीन नाशिकमधील पाटीलनगर मैदानावर शिवसेना जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर व माजी नगरसेविका हर्षा बडगुजर यांच्या वतीने आयोजित महासत्संग सोहळ्यात अण्णासाहेब मोरे बोलत होते. सध्या सर्वत्र मोठया प्रमाणात औषधे फवारणी करूनच शेतातून पीक घेतले जाते. त्यामुळे नागरिकांना अनेक व्याधी जडल्या आहे. पिकांवर विषारी औषध फवारल्याने कॅन्सरसारख्या भयानक आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे, अशी चिंता गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केली आहे.
असाध्य आजारामुळे अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यात दिवसेंदिवस वाढ होतच आहे यामुळे नागरिकांना कॅन्सरसारख्या आजाराचा खर्च फिटवणे ही मुश्किल होत आहे. यामुळे या आजारावर इलाज होण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून, यासाठी आजारमुक्त होण्यासाठी औषध तयार करण्यात आले आहे. आज सर्वत्र मोबाइलचा जमाना आलेला आहे. यामुळे कुटुंबातील एकमेकांमधील संवाद हरपलेला आहे. कुटुंब कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती ही आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे कामाकडे अधिक लक्ष दिले जाते. मात्र, यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होत आहे; परंतु मुलांकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा वाईट परिणाम समाजात दिसून येत आहे. यासाठी कुटुंबातील वडिलधाऱ्या व्यक्तींनी कामकाजाबरोबरच आपल्या मुलांकडेही लक्ष देणे तितकेच गरजेचे आहे. मुलांना सुसंस्कृत घडवण्यासाठी सण-उत्सव साजरे करण्याबरोबरच धार्मिक जुन्या रिती परंपरादेखील जोपासून आपल्या मुलांना याकडे वळविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या महिला व मुलींवर अत्याचाराचे प्रकार सातत्याने वाढले आहेत. यासाठी आपल्या मुलांना संस्कार घडविणे गरजेचे असून, घरातील वडिलधाºया व्यक्तींनी व आई-वडिलांनी याकडे लक्ष देऊन कामाबरोबरच मुलांकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचेही गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेना महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी महापौर वसंत गिते, माजी नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, रत्नमाला राणे, शीतल भामरे, दीपक बडगुजर, सचिन राणे, पवन मटाले, संजय भामरे, देवानंद बिरारी, देवेंद्र शेलार, ऋ षी वर्मा, नीलेश साळुंखे, विनोद दळवी आदी उपस्थित होते.