नुकसानग्रस्त शेतकरी उपोषणाच्या पवित्र्यात
तुषार रैंदळ, सटाणा (प्रतिनिधी): जायखेडा (ता. बागलाण) येथील तेरा शेतकऱ्यांनी नामपूर येथील बालाजी हायटेक नर्सरीतून अमेरिकन हायब्रीड सीडस इंडिया बेंगलोर कंपनीद्वारे उत्पादित टोमॅटो वाण इनडम १३२० रोपांची काबाडकष्ट करून लागवड केली होती. वेळोवेळी औषध फवारणी केली. मात्र टोमॅटोच्या झाडांवर फुलोरासह फळधारणा अत्यल्प झाली. याबाबत नर्सरी मालक व कंपनी प्रतिनिधींकडे तक्रार केली.
मात्र तक्रारीची कोणतीही दखल संबंधितांनी न घेता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याबाबत कंपनीकडून उडवाउडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली जात आहे. येत्या पाच दिवसांत आम्हाला न्याय मिळाला नाही, तर १३ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कुटुंबातील सदस्यांसह कृषी विभागाच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार कृषी विभागाने तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीमार्फत पाहणी करून नुकसानग्रस्त क्षेत्राचा पंचनामा केला. पाहणीदरम्यान तक्रारीत तथ्य असल्याचा निर्वाळा दिला. कंपनी प्रशासनाकडून कृषी विभागाच्या अहवालालाही न जुमानता एकप्रकारे ठेंगा दाखवण्याचा प्रकार चालवला आहे. चर्चेसाठी आज येतो कृषी विभागाचा अहवाल, तरीही मुजोरी शासनाकडून दरवर्षी बोगस बियाणे, खते, विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कारवाईसाठी कठोर नियमावली तयार केली आहे; परंतु काही कंपन्या या नियमाला हरताळ फासून आपले चांगभलं करत असतात. बोगस बियाण्याबाबत कंपनी प्रतिनिधींना कळवले तरी ते मुजोरी करून जे होईल ते करून घ्या, असा दम बळीराजाला देतात, ते कोणाच्या पाठबळावर ? याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कृषी विभागाने अहवाल दिला असतानाही कंपनीकडून मुजोरी दाखवली जात आहे. ती कोणाच्या जिवावर हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
उद्या येतो, अशी चेष्टा कंपनी प्रशासनाकडून चालवली आहे. जायखेडा शिवारातील शेतकरी महेद्र बापू बच्छाव व दीपक वामन खैरनार व इतर तेरा शेतकरी गेल्या ८ ते १० वर्षांपासून नियमित टोमॅटोची लागवड करतात. यंदाही मे. बालाजी हायटेक नर्सरीतून (नामपूर) रोपे खरेदी केली लागवडीनंतर रोपांची योग्य काळजी घेतली. वेळोवळी कीटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी केली. मात्र ऐन फळधारणेच्या वेळी फूलधारणा व फळधारणा अत्यल्प असल्याचे दिसून आले. संबंधित शेतकऱ्यांनी नर्सरी व कंपनीशी संपर्क साधला, कंपनीने लक्ष दिले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे संपर्क केला. तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने गेल्या २६ जुलैला पंचनामा केला. बियाणे उत्पादक कंपनी आजही लक्ष देत नाही. आमचे जे नुकसान झाले आहे. त्याची कंपनीने त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमार्फत केली जात आहे. कंपनीने नुकसानभरपाई न दिल्यास उपोषणास बसण्याचा इशारा वसंत अहिरे, नारायण शेवाळे, नीलेश बच्छाव, चंद्रकांत पठाडे, मोहन सोनवणे, बाळू सोनवणे, दावल जगताप, चंद्रकांत पठाडे, सुमनबाई जगताप, तुळशीदास बच्छाव, त्र्यंबक जगताप, अशोक बागूल, महिंद्र बच्छाव आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.