नवीन आधार कार्ड काढण्यासाठी देवळा येथे आधार केंद्र सुरू 

खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच वैभव पवार यांच्या पाठपुराव्याला यश..!

जगदिश निकम,

देवळा (प्रतिनिधी): देवळा तालुक्यातील अठरा वर्ष पूर्ण झालेले मात्र अद्याप त्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा नागरिकांना नवीन आधार नोंदणी करण्यासाठी देवळा येथे आधार केंद्र सुरू करण्याची मागणी खामखेडा येथील सरपंच वैभव पवार यांनी निवेदनाद्वारे केली होती याची दखल घेत प्रशासनाकडून देवळा शहरात आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे.
देवळा तालुक्यातील १८ वर्ष पूर्ण झालेल्या बहुसंख्य नागरिकांनी अद्यापपर्यंत आधार कार्ड काढलेले नाहीत यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी त्यांना अर्ज दाखल करता आलेले नाही. १८ वर्षाच्या पुढे वय झाल्याने त्यांना तालुक्यात इतर आधार केंद्रावर आधार कार्ड काढून मिळत नाही त्यामुळे नाशिक अथवा इतरत्र ठिकाणी जावे लागत होते. आधार कार्ड प्राप्त होत नसल्याने शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागत असून अशा नागरिकांसाठी देवळा येथे आधार केंद्र सुरू करून त्यांचे आधारसाठी होणारे हाल थांबवावे अशी मागणी खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच वैभव पवार यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि देवळा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती त्याची दखल घेत देवळा शहरात नुकतेच आधार केंद्र सुरू करण्यात आले असून यामुळे नव्याने आधार नोंदणी करणारे तसेच आधार अपडेट करण्यासाठी इतर आधार केंद्रावर तासनतास ताटकळत उभ्या राहणाऱ्या नागरीकांना देखील दिलासा मिळणार आहे.

“देवळा शहरात एकमेव आधार केंद्र कार्यान्वित असल्याने नवीन आधार नोंदणी तसेच आधार अपडेट करण्यासाठी नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत होते.१८ वर्षाच्या पुढील नागरिकांना आधार नोंदणीसाठी नाशिक येथे जावे लागत असल्याने त्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास होत होता आता देवळा शहरात नव्याने आधार केंद्र सुरू केल्याने नागरिकांचे आधारसाठी होणारे हाल थांबणार आहेत.”
– वैभव पवार,सरपंच खामखेडा

“देवळा शहरात १८ वर्षाच्या पुढील नागरिकांना नवीन आधार नोंदणी व अपडेट करण्यासाठी आधार केंद्र सुरू करण्यात आले आहे.तसेच नवीन आधार कार्ड काढणे, तसेच आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शासकीय शुल्क ठरलेले आहे. त्या शुल्कापेक्षा जास्त शुल्क देऊ नये तसेच जास्तीचे शुल्क घेत असल्यास नागरिकांनी संबंधित केंद्रांची तक्रार तहसीलदार कार्यालयाकडे करावी. संबंधित केंद्रावर कायदेशीर कारवाई केली जाईल.”
-डॉ.मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार देवळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!