आपत्कालीन कक्षास संपर्क करानाशिक महानगरपालिकेचा आपत्कालीन कक्ष २४ तास सुरू ठेवण्यात आला आहे. आपत्कालीन कक्ष संपर्कासाठी क्र. ०२५३-२५७१८७२, ०२५३-२३१७५०५, मुख्य अग्निशमन केंद्र, शिंगाडा तलाव क्र. ०२५३-२५९०८७१ असे असून, या क्रमांकांवर आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गोदामाई दुथडी भरून वाहात असून, रामकुंड परिसराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. गोदापात्रातील सर्व मंदिरे पाण्याखाली असून, परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक बंद व उघड्या असलेल्या टप-यांमध्ये पाणी शिरल्याने मालाचे मोठे नुकसान झाले आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागले असून, शनिवारपासून पूरस्थिती ‘जैसे थे’च आहे. दक्षता म्हणून परिसरात वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिक शहर परिसरात गुरुवार (दि. २२) पासून सलग चार दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने ठिकठिकाणी पाणी साचले आहे. शनिवारी (दि. २४) सायंकाळनंतर वाढलेल्या पावसाने गोदावरी नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे.
पंचवटीतील रामकुंड परिसर पाण्यात बुडाल्याने या परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोदावरी नदीत वाढत असलेल्या पाण्याच्या पातळीमुळे नदीकिनारच्या रहिवाशांना आपत्ती व्यवस्थापनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संपूर्ण शहरात पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने ठिकठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे. त्यामुळे द्वारका, पंचवटी, मुंबई नाका, पाथर्डी फाटा, त्रिमूर्ती चौक, उंटवाडी, शालिमार, एम. जी. रोड, अशोक स्तंभ, सातपूर अशा शहरातील वर्दळीच्या ठिकाणी सकाळपासून वाहतूक विस्कळीत झाली होती. पावसाने वाहून आलेला चिखल रस्त्यावर आल्याने अनेक ठिकाणी दुचाकी वाहने घसरताना दिसून आले.
आपत्ती व्यवस्थापनाकडून सतर्कतेचा इशारागुरुवारी रात्रीपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरीची पाणी वाढत असून नदीकिनारी राहणाºयांना आपत्ती व्यवस्थापनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर आणि आळंदी धरणाच्या खालील भागामध्ये (फ्री कॅचमेट एरिया) पावसाचे प्रमाण वाढत असल्याने आणि तेथून प्रवाहित होणाºया पाण्याचा प्रवाह हा गोदावरी नदीस येऊन मिळत असल्याने गोदावरीची पाणीपातळी वाढत आहे. त्यामुळे मनपा व पोलीस प्रशासनाकडून सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
