गणेशोत्सव संपत आला, तरीही आनंदाचा शिधा अजूनही गोदामातच!

नाशिक (प्रतिनिधी): राज्य शासनाकडून शिधापत्रिकाधारकांसाठी यंदाच्या गणेशोत्सवात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात अजूनही काही दुकानांवर हा शिधा पोहोचलेला नाही. दुसरीकडे, शहरातील काही स्वस्त धान्य दुकानांमध्ये नागरिकांना तांदूळ मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. आनंदाचा शिधा न मिळाल्याची तक्रार लाभार्थ्यांकडून होत आहे.
गणेशोत्सवानिमित्त राज्य सरकारकडून प्राधान्य कुटुंब योजना आणि अंत्योदय अन्न योजनेत वितरित करण्यात येणाºया आनंदाचा शिधाचे अद्याप १०० टक्के वाटप सुरू झालेले नाही. नाशिक जिल्ह्यात एकूण आठ लाख ५४ हजार ६५८ लाभार्थ्यांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा वाटप केला जातो. सण-उत्सवांच्या काळात जनतेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी राज्य सरकारने शंभर रुपयांत आनंदाचा शिधा ही योजना सुरू केली. यात एक किलो रवा, हरभरा डाळ, साखर व एक लिटर सोयाबीन तेल दिले जाते. चालू वर्षी आनंदाच्या शिध्यात बदल झाला आहे. एक किलो मैदा व एक किलो पोहे रद्द करून सरकारने रवा व तेल वाढवले. त्यामुळे आनंदाचा शिधा गरिबांसाठी महत्त्वपूर्ण ठरतो. त्याचे लाभार्थीही निश्चित झाले आहेत.
जिल्हा पुरवठा विभाग त्याप्रमाणात राज्य शासनाकडे मागणी करते. जिल्ह्यातील एकूण साडेआठ लाख लाभार्थ्यांमध्ये अंत्योदय योजनेचे एक लाख ७६ हजार १८ लाभार्थी आहेत, तर प्राधान्य कुटुंबाचे सहा लाख ७८ हजार ६४० लाभार्थी आहेत. या दोन्ही गटांतील लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा दिला जातो. सोबत एक कापडी पिशवीही मिळते. गणेशोत्सव काळात आनंदाचा शिधा वाटपाच्या वस्तू अपूर्ण प्रमाणात आल्याने ठराविक तालुक्यांमध्येच त्याचे वाटप झाले. आता गणेशोत्सव संपला, तरी आनंदाचा शिधा काही लोकांना मिळालेला नाही. गणेशोत्सव संपल्यावर तरी हा शिधा मिळेल की नाही, याविषयी त्यांच्या मनात साशंकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!