सातपूर (प्रतिनिधी): चुंचाळे शिवारातील भोर टाऊनशिप परिसरात असलेल्या शेततळ्यात घसरून पडल्याने दोन सात वर्षीय मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.२२) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत अशरफ अक्रम खान व इरशाद शहा यांचा मृत्यू झाला असून, स्थानिक तरुणांच्या मदतीने तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमानंतर दोन्ही चिमुकल्यांचे मृतदेह तळ्याबाहेर काढण्यात यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर-अंबड लिंकरोडवरील अंबिका संकुल परिसरात राहणारे चार समवयीन मुले दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर पडले. खेळता खेळता ते भोर टाऊनशिप परिसरातील सुमारे २० एकरच्या क्षेत्रात तयार करण्यात आलेल्या १०० मीटर रुंद, २०० मीटर लांब व सुमारे ३५ मीटर खोली असलेल्या शेततळ्याजवळ पोहोचले. यावेळी चौघांपैकी अशरफ व इरशाद यांनी तळ्याच्या पाठीमागील बाजूने तारेच्या कंपाउंडमधून आत प्रवेश केला. शेततळे उंचावर असल्याने त्यांनी कसरत करीत तळ्याचे टोक गाठले. मात्र, तेथून घसरल्याने ते पाण्यात पडले. यावेळी त्यांच्यामागे असलेल्या दोन्ही मुलांनी घराकडे पळ काढून ही माहिती दिली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी तळ्याकडे धाव घेत दोघा चिमुकल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, खोल पाण्यात मुलांचा सुगावा लागला नाही. शेतीच्या परिसरात शेततळे असल्यामुळे जेसीबीद्वारे तळ्यातील पाणी काढण्यासही अडथळा येत होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्यात उतरलेल्या स्थानिक युवकांना मुलांना शोधण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. त्यानुसार तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात स्थानिक तरुणांना यश आले. मयत अशरफचे वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात, तर इरशादचे वडील आयुर्वेदिक औषधांची विक्री करतात. दोन्ही कुटुंबांतील चिमुकल्यांवर एकाचवेळी काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
