पाणीपुरवठा विभागात निवेदनकरताच आश्वासना ऐवजी विद्युत मोटारी बसवण्याचा सल्ला!
नाशिक (प्रतिनिधी): सिडको पसिरातील डीजीपीनगर २, कामटवाडा परिसरात गेले काही दिवसांपासून दूषित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तसेच पाण्याचा दाब कमी असल्याने संतप्त महिलांनी मनपा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर यांना निवेदन देऊन यासंदर्भात तक्रार केली आहे. दरम्यान, पाणीपुरवठा उच्च दाबाने करण्याचे आश्वासन देण्याऐवजी धारणकर यांनी तळघरात टाकी बांधून विद्युत मोटारी बसवण्याचा सल्ला दिल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
यामुळे डासांची उत्पत्ती व डेंगू, मलेरिया सारखे साथीच्या रोगांत वाढ होण्याची शक्यता आहे? असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे.
शहरातील पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. कामटवाडे परिसरातदेखील दूषित आणि कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे दुस-या, तिस-या मजल्यावर पाणी पोहोचत नाही.
याबाबत वारंवार तक्रारी करूनदेखील प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने महिलांचे दैनंदिन कामावर परिणाम होत आहे. तसेच पाणीपुरवठा पहाटे लवकर होत असून, पाण्याची वेळ पहाटे पाच वाजेनंतर करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर परिसरातील भाग्यश्री घरटे, पुजा लहामगे, वृंदा मथुरे, रुपाली ठाकरे, ज्योती घरटे, निशा पाटील, भाग्यशी घरटे, सुरेखा ताकाटे, सोनाली कठाळे, गायञी चव्हाण, लिना महाजन, राधिका पाटील, पुनम भांबर, चैतली देशमुख अदींसह पन्नासहून अधिक महिलांच्या स्वाक्ष-या आहेत.