नाशिक (प्रतिनिधी): वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात मोठे नुकसान केले आहे. यात लहान-मोठ्या एकूण ३४ जनावरांचा बळी गेला आहे. तसेच ९० घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
ऑक्टोंबर महिना हा पावसाचा हंगाम नसला तरी जिल्ह्यात पावसाळ्याप्रमाणे पाऊस पडत आहे. या पावसामुळे जिल्हाभर कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे शेतीमालाचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर अनेक गायी, म्हशी, बैल, शेळ्या यांसारख्या पाळीव जनावरांचाही वीज पडून मृत्यू झाला आहे. यात एकट्या चांदवड तालुक्यातील २५ जनावरांचा बळी गेला आहे. नांदगावात चार, निफाडमध्ये तीन आणि दिंडोरीत दोन जनावरांनी जीव गमावल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
चांदवड तालुक्यातील रस्ते, पुल, बंधारे यांसारख्या पाच सरकारी मालमत्तांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय ४६ दुकानांमध्ये पाणी जाऊन व्याससायिकांचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत एकूण ९० घरांची पडझड झाली आहे. यामध्ये ८९ घरांची अंशत: तर सुरगाणा तालुक्यातील एका घराची पूर्ण पडझड झाली. चांदवडमधील ३५, बागलाणमधील १५, निफाडमधील १२ तर कळवणमधील आठ घरांचा यामध्ये समावेश आहे. याशिवाय निफाड तालुक्यातील पाच झोपड्या आणि दोन गोठ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा सर्वाधिक तडाखा चांदवड आणि देवळा तालुक्याला बसला आहे. चांदवडमधील १०० तर देवळ्यातील ४५ कुटुंब पावसामुळे बाधित झाली आहेत. जिल्ह्याला शनिवारी (दि. २०) परतीच्या पावसाने तडाखा दिला. या पावसामुळे एकाच दिवसात ३८ हजार ५५४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका बसला आहे. यात भात, मका, सोयाबीन, कांदा, टोमॅटोसह भाजीपाल्याचा समावेश आहे. चांदवड व देवळा भागात ढगफुटीसदृश्य पर्जन्य झाल्याने सर्वाधिक नुकसान झाले आहे. नाशिक, मालेगाव, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व सिन्नर तालुक्यातही पावसाचा जोर दिसून आला.