समर्थकांची मते जाणून घेत पाटीलांनी मनसेकडून तिकिट घेत दंड थोपटले!

नाशिक पश्चिममध्ये तिरंगी लढत होणार चुरशीची!

नाशिक (प्रतिनिधी): पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपकडून आ. सीमा हिरे, ठाकरे गटाकडून सुधाकर बडगुजर, तर भाजपला अन्याय झाल्याचा शिडकावा देत दिनकर पाटील मनसेकडून उमेदवारी करणार असल्याने या मतदारसंघात आता तिरंगी लढत होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून उमेदवारी जाहीर होत असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीत नाराजांकडून बंडाचे निशाण फडकावले जात आहे. तसेच, अनेक जण पक्षला सोडचिट्ठी देत इतर पक्षांत प्रवेश करून उमेदवारी मिळवत असल्याने राजकीय समीकरणे बदलत आहेत.
नाशिक पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून दिनकर पाटील यांनी तयारी सुरू केली होती. त्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेत शब्द ही घेतला होता, असा दावा पाटील यांनी यापूर्वीच केला होता. मात्र, भाजपाने विद्यमान आमदार सीमा हिरे यांनाच उमेदवारी दिल्याने पाटील नाराज झाले. समर्थकांची मते जाणून घेत त्यांनी निवडणुकीसाठी दंड थोपटले. त्यानुसार बुधवारी (दि. २३) त्यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेत उमेदवारी मिळविली. त्यामुळे भाजपाला धक्का बसला आहे. पाटील यांनी लोकसभेसाठी देखील तयारी करीत उमेदवारी मागितली होती. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील यांची मनधरणी केली होती. मात्र, आता विधानसभेला देखील त्यांना उमेदवारी न मिळाल्याने पाटील यांनी मनसेचा पर्याय निवडत निवडणूक लढविण्याचे निश्चित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!