- आतापर्यंत महापालिकेकडून ३६ लाडक्या भावांची नियुक्ती
- संकेतस्थळाला वारंवार अडचणी येत असल्याने इच्छुक भावांकडून कडून नाराजी
जगदीश वाघ,
नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर राज्यातील युवा तरुण बेरोजगारांना रोजगार देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अर्थातच लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून नाशिक महापालिकेत आतापर्यंत ३६ जणांची सहा महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत २५२ पदांवर काम करण्याची बेरोजगार तरुणांना संधी मिळणार आहे.
महायुती सरकारने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहता, तसेच त्यावर विरोधकांनी टीका करीत लाडक्या भावांसाठी काय, असा प्रश्न उपस्थित करीत सत्ताधारी महायुतीला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेत थेट लाडका भाऊ योजनाच सुरू केली. या योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेली रिक्त पदे मानधन तत्त्वावर भरण्यात येणार असून, या योजनेचा शासन निर्णय जारी करीत, त्याची अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून इयत्ता बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण असलेल्या वेगवेगळ्या उमेदवारांना यासाठी आॅनलाइन अर्ज करता येणार आहेत. मात्र, ज्या ठिकाणी अर्ज करायचा आहे, त्या संकेतस्थळाला वारंवार अडचणी येत असल्याने तरुणांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दिवसा तर संबंधित संकेतस्थळ ओपनच होत नसल्यामुळे अनेकांना रात्री उशिरापर्यंत जागून नोंदणी करावी लागत आहे. नाशिक महापालिकेने १९ कनिष्ठ लिपिक, नऊ कनिष्ठ अभियंता, सात सफाई निरीक्षक व अन्य एका पदावर प्रशिक्षणार्थी म्हणून तरुण बेरोजगारांची नियुक्ती केली आहे.
संकेतस्थळावर लोड असल्यामुळे इच्छुक उमेदवार महापालिकेत येऊन विचारणा करीत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासन उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर स्वत: उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी कर्मचा-यांमार्फत मदत करत आहेत. या योजनेअंतर्गत बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवाराला सहा हजार, आयटीआय-पदविका पास असलेल्या उमेदवाराला १० हजार आणि पदवी-पदव्युत्तर उमेदवाराला १२ हजार रुपये वेतन दिले जाणार आहेत. मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेसाठी आधारसोबत बँक खाते लिंक असावे. प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन उमेदवाराच्या थेट बँक खात्यात (डीबीटी) आॅनलाइन अदा केले जाणार आहे.