कृष्णा पैठणे,
वणी (प्रतिनिधी): येथील कर्म. रावसाहेब थोरात माध्यमिक विद्यालयातील सन २०००-२००१ च्या इयत्ता १० तुकडी ब च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा तब्बल २४ वर्षांनी एकत्र येत शालेय मित्र मैत्रिणीनी एक दिवसाची शाळा भरवत जुन्या आठवणीना उजाळा दिला.
वणी येथील कर्म. रावसाहेब थोरात माध्यमिक विद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०००-२००१ च्या इयत्ता १० तुकडी ब च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेह मेळावा नाशिक येथील हॉटेल संस्कृती येथे उत्साहात पार पडला. तब्बल २४ वर्षांनी येऊन एकमेकांना भेटणाऱ्या बाल मित्रांनी स्वयंशिस्त पाळत शालेय प्रार्थना म्हणून कार्यक्रमास प्रारंभ केला. विशेष म्हणजे कार्यक्रमास कोणतेही अध्यक्ष नसताना कार्यक्रम सूत्रबद्ध व सुरळीत पार पडला. दरम्यान सर्वांनी गत २४ वर्षांचा जीवन प्रवास आपल्या बाल मित्रासमोर मांडला व काही मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. तसेच अकाली निधन झालेल्या शिक्षिका डॉ. नीलम बागुल व ३ दिवंगत मित्रांच्या आठवणींना उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्याचप्रमाणे एकमेकांची व कुटुंबियांची आस्थेने चौकशी करून भावी वाटचालीस शुभेच्छा देत पुन्हा भेटू असा शब्द देत एकमेकांचा निरोप घेतला. सदर स्नेह मेळाव्यात २० माजी विद्यार्थी तर २८ माजी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या, सर्व उपस्थितांना स्मृती चिन्ह प्रदान करण्यात आले तर राहुल बच्छाव यांच्या वतीने प्रत्येकास शोभेच्या झाडांची रोपे भेट म्हणून देण्यात आली. सदर कार्यक्रमाची संकल्पना सचिन पैठणे यांची होती, सूत्रसंचलन जितेंद्र क्षीरसागर, अमोल गावित यांनी केले व आभार महेंद्र पैठणे यांनी मानले. तर कार्यक्रम संयोजनासाठी सुषमा महाले, योगिता कोल्हे, मोहिनी ढगे, सुवर्णा सातपुते आदींसह सर्वांनी परिश्रम घेतले.
