जगदिश निकम,
देवळा (प्रतिनिधी): देवळा येथील अभिष्टचिंतन सोहळ्यात रंगला विधानसभेचा कलगीतुरा, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचा वाढदिवस सोहळा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे. त्यात अभिष्टचिंतन सोहळ्याच्या दिवशीच दहीहंडी महोत्सव योगायोगाने घडून आल्याने देवळा येथे तालुका व परिसरातील हजारो युवकांनी एकत्र येऊन केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात महोत्सव साजरा करण्यात आला. त्यात ३१००० रुपयांची मानाची दहीहंडी फोडण्यात आली.त्याचबरोबर महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन तालुक्यातून हजारो महिलांनी सहभाग नोंदवून विविध खेळातून बक्षिसे पटाकावली.
येत्या दोन महिन्यांत विधानसभा निवडणूक होऊ घातली असून त्यात केदा आहेर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यातील युवक ,महिला व नागरिक यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवून आपल्या विधानसभेच्या उमेदवारीचे रणशिंग फुकले त्यामुळे तालुक्यात आगामी काळात विधानसभेचे उमेदवार म्हणून सर्वानुमते केदा आहेर यांच्या नावावर शिकामोर्तब केले आहे.
अभिष्टचिंतन सोहळ्यात अनेक वक्त्यांनी आमदार डॉ. राहुल आहेर उपस्थित असतांना आगामी विधानसभा निवडणुकीत केदा आहेर यांनी उमेदवारी करावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यावेळी डॉ राहुल आहेर आपले काय मत व्यक्त करतात याकडे सर्वांची उत्सुकता लागुन होती. त्यात एका वक्त्यांने कमळाने न्याय न दिल्यास आमच्या पक्षाची तुतारी घ्या असा उल्लेख केल्याने यावर डॉ. आहेर यांनी त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत आमच्या बंधुमध्ये कोणीही फूट पाडण्याची गरज नाही. आमचा निर्णय घेण्यास आम्ही सक्षम आहोत यासाठी कुणी घरफोडीचे काम करू नये आपल्या पक्षात जे झाले ते आमच्या घरात होणार नाही. असा सज्जळ दम देऊन आम्ही दोघे भाऊ निर्णय सक्षमपणे घेऊ असे सांगून त्यांनी त्यास छेद दिला.
यावेळी केदा आहेर यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त जमलेल्या सर्वांचे आभार मानत सोहळ्यास उत्तर देताना म्हणाले की ‘ गेली ३५ वर्ष राजकारणात आपण अनेकांना मदत करून पदे मिळवून दिली परंतु मला आता विधानसभा लढवायांची आहे अशी इच्छा व्यक्त केली असून वाढदिवसानिमित्त एखादा बालक जसा हट्ट धरतो तसा आमदार डॉ राहुल आहेरांकडे त्यांनी विधानसभा उमेदवारीचा हट्ट असल्याचे बोलून दाखवल्याने समर्थकांचा उत्साह त्याठिकाणी अधिक दिसून आला आणि टाळ्या आणि शिट्ट्याच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बाबुराव पाटील ,विलास देवरे, संजय धोंडगे, यशवंत गोसावी, पंडित निकम, जितेंद्र आहेर ,संजय जाधव आदि. डॉ.दौलतराव आहेर सभागृहात सर्वपक्षीय अभिष्टचिंतन सोहळ्यात मतदार संघातून बहूसंख्य राजकीय पुढारी व कार्यकर्ते उपस्थित होते.