सटाणा (प्रतिनिधी): ढोलबारे (ता. बागलाण, जि. नाशिक) येथे ‘खाजगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार’ समितीची स्थापना झाली आहे. या कृषी बाजारात दिवसाला हजारो शेतकरी, व्यापारी, कर्मचारी यांचे येणे-जाणे सुरु असते. नाशिक शहरातूनही काही व्यापारी, कर्मचारी ढोलबारे येथिल बाजार समितीत त्यांच्या कामकाजासाठी ये-जा करतात; त्याबरोबरच साक्री, नंदूरबार येथूनही बरेच लहानमोठे व्यापारी, शेतकरी या बाजार समितीत येत असतात; मात्र महामंडळाची बस बाजार समिती समोर थांबत नसल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण होते.
महामंडळाचे हक्काचे उत्पन्न देखिल दूरावले जाते. कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार ही नाशिक-नवापूर या महामार्गावरच आहे; तसेच ही बाजार समिती महाराष्ट्रातील एक नामांकीत कृषी बाजारात गणली जाते, वेळोवेळी या बाजारसमितीच्या कार्याचे कौतूक अनेक मोठ-मोठ्या अधिकाऱ्यांनी, राजकीय पुढाऱ्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यांनी देखिल बाजार समितीसाठी दिर्घपल्ल्याच्या वाहनांसह अधिकृत बस थांब्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार ही सर्वसामान्यांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते, त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना दळणवळणासाठी आपल्या महामंडळाच्या बसेसच्या थांब्याची मोठी आवश्यकता आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी; महामंडळाच्या उत्पन्नवाढीच्या कार्यात सहभाग मिळण्यासाठी ‘खाजगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार’, ढोलबारे, ता. बागलाण, जि. नाशिक या बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ म.रा.मा.परिवहन महामंडळाच्या दिर्घ पल्ल्याच्या बसेससह अधिकृत बस थांबा लागू करण्यात यावा ही मागणी बाजार समितीतर्फे उपसचिव प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडे केली आहे. लवकरच हा थांबा लागू करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक अरुण यांच्या यांनी सांगितले आहे.