तुषार रौंदळ, सटाणा : बागलाण तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या, शिक्षकांच्या बदली-पदोन्नतीसह शैक्षणिक अडचणी सोडविणे तसेच जिल्हा परिषद शाळांचा दर्जात्मक व भौतिक विकास साधण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आमदार दिलीप बोरसे यांनी दिली.
किरातवाडी (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे होत्या.
या शिक्षण परिषदेस नवनिर्वाचित नगराध्यक्षा हर्षदा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ, नगरसेवक राहुल पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद भामरे, सरपंच चित्रा बागुल, उपसरपंच अनिल गायकवाड, सटाणा बाजार समितीचे माजी सभापती नरेंद्र अहिरे, नामपूर बाजार समितीचे उपसभापती युवराज पवार, गटविकास अधिकारी अतुल पाटील, विस्तार अधिकारी तुषार महाले, केंद्रप्रमुख विलास पवार, संघाचे तालुकाध्यक्ष देवा पवार, राज्य समिती सदस्य नितीन सोनवणे, संघाचे सरचिटणीस संतोष सावंत, महिला आघाडी प्रमुख सुजाता गायकवाड, मुख्याध्यापक अरुण सोळुंके, चित्रा बेडीस, कक्ष अधिकारी नरेंद्र कचवे, दीपक सोनवणे यांच्यासह सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार दिलीप बोरसे पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यामध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शिक्षकांना भेडसावणाऱ्या समस्या वेळेत सुटल्या तर गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचते. शासनस्तरावर तसेच स्थानिक पातळीवर आवश्यक पाठपुरावा करून शाळांसाठी भौतिक सुविधा, वर्गखोल्या, शौचालये, डिजिटल शिक्षण, खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
यावेळी नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांनी मनोगतात ग्रामीण भागातील शिक्षकांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी असल्याचे सांगितले. शिक्षकांच्या मेहनतीमुळे जिल्हा परिषद शाळांचा चेहरामोहरा बदलत असून शहरी शाळांच्या तुलनेत ग्रामीण शाळाही गुणवत्तेत पुढे जात आहेत. शहर व ग्रामीण भागाचा समतोल विकास साधण्यासाठी आपण सातत्याने कार्यरत राहू, असे त्यांनी नमूद केले. याप्रसंगी केंद्रातर्फे आमदार दिलीप बोरसे, नगराध्यक्षा हर्षदा पाटील, उपनगराध्यक्ष सुमित वाघ, नगरसेवक राहुल पाटील, गटविकास अधिकारी अतुल पाटील, गटशिक्षणाधिकारी चित्रा देवरे, सरपंच चित्रा बागुल, उपसरपंच अनिल गायकवाड आदी मान्यवरांचा स्टील बाटली देऊन सत्कार करण्यात आला. तसेच बदली झालेले व नव्याने नियुक्त झालेले शिक्षक-शिक्षिकांचाही सन्मान करण्यात आला. बदली झालेल्या शिक्षक अमोल अहिरे, प्रतिभा कापडणीस व संतोष सावंत यांनी आपल्या मनोगतात सेवा कालावधीतील अनुभव सांगून सहकाऱ्यांचे आभार मानले. शिक्षण परिषद यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शरद भामरे, शिक्षिका अनिता देवरे, राजेंद्र पाटील, व्ही. टी. पवार, धनराज भामरे, अमित सोनवणे आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक स्वप्निल जाधव यांनी केले तर आभार हेमंत महाले यांनी मानले.
