नाशिकरोड कारागृहाचे फायर सेफ्टी ऑडिट होणार काय?

सेंट्रल जेलचे मनपाला विनंती पत्र तर मनपा जबाबदारी टाळण्याच्या विचारत

नाशिक (प्रतिनिधी) : सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नाशिकरोड कारागृहाचे फायर सेफ्टी ऑडिट करून द्यावे, असे विनंती पत्र कारागृह प्रशासनाने महापालिकेस धाडले आहे. आधीच मनुष्यबळाची वानवा असल्यामुळे कारागृहाने प्राधिकृत संस्थांकडून फायर सेफ्टी ऑडिट करून घ्यावे, असे उलट टपाली उत्तर महापालिका प्रशासन कारागृह अधिक्षकांना पाठवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह हे अत्यंत संवेदनशील कारागृह आहे. येथे सध्या ३५० अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून, जवळपास २७०० बंदी आहेत. त्यात १९९३ सालातील मुंबई बॉम्ब स्फोट प्रकरणासह दाऊद गँग, गवळी गँग, सुभाषसिंग ठाकूर गँग, राजन गँग, रवी पुजारी गँग, जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट, मुंबई रेल्वे बॉम्ब स्फोट तसेच पाकिस्तान, बांग्लादेशसह विदेशातील वेगवेगळया गुन्ह्यातील कैद्यांचा समावेश आहे.
विविध प्रकारच्या जोखीम टाळण्याच्या दृष्टीने कारागृह प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. त्याच अनुषंगाने कारागृहाचे अग्निसुरक्षा परीक्षण अर्थात, फायर सेप्टी ऑडिट आवश्यक आहे. कारागृहाच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडिट सार्वजनिक बांधकाम विभाग, नाशिक यांच्या मार्फत करण्यात आलेले आहे. सिक्युरिटी ऑडिट संबंधित शासकीय विभागांकडून प्रत्येक वर्षी करून घेण्यात येत आहे. या कारागृहाचे फायर सेप्टी ऑडिट मनपाकडून केले जाणे अपेक्षित असल्याचे कारागृह अधीक्षकांनी आपल्या पत्रात नुमद केले आहे. मनपाच्या संबंधित अधिका-यांना कारागृहात पाठवून अग्निसुरक्षा परीक्षण करून अहवाल उपलब्ध करुन द्यावा, अशी विनंतीही मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक अरूणा मुगूटराव यांनी महापालिकेला केली आहे.
मनपाच्या अग्निशमन विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे. फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट करण्यासाठी शासनाने अधिकृत संस्थांची नियुक्ती केलेली आहे. या संस्थांची यादी मध्यवर्ती कारागृह प्रशासनाला सादर केली जाईल. त्यातील योग्य संस्थेकडून फायर आॅडिट करून घेण्याविषयी कारागृह अधिक्षकांना कळविण्यात येईल.
– संजय बैरागी, मुख्य अग्निशमन अधिकारी, मनपा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!