नोंदीत चूक दुरुस्तीच्या मोबदल्यात तलाठी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात!

नाशिक (प्रतिनिधी): चूक दुरुस्तीची नोंद सातबारा उता-यावर घेण्याच्या मोबदल्यात एक हजार रुपयांची लाच स्वीकारणा-या नगरसूल व कुसमाडी (ता. येवला) येथील तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला. याप्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापू वामनराव पवार (वय ५४) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. संशयित पवार सजा नगरसूल येथे कार्यरत असून, त्याच्याकडे तालुक्यातील कुसमाडी या गावाचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. ४९ वर्षीय तक्रारदाराने त्यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीची पत्नी व मुलाच्या नावे दुय्यम निबंधकांकडे दस्त नोंदणी केली होती . त्याची ७/१२ उता-यावर नोंद लावण्यासाठी तक्रारदाराने संशयित तलाठी पवार यांच्याकडे नोंदणी दस्त दिले असता, त्यात मुलाच्या नावात चूक झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे हे दस्त रद्द करण्यात येऊन नव्याने नोदणी करण्यात आली होती. ही नोंदणी तक्रारदार संशयित तलाठ्याकडे घेऊन गेले असता, त्याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. दुरुस्तीची ७/१२ उता-यावर नोंद घेण्याच्या मोबदल्यात स्वत:साठी एक हजार व मंडळ अधिका-यासाठी ५०० रुपयांची मागणी करण्यात आली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधल्याने बुधवारी (दि. ८) सापळा लावण्यात आला होता. संशयित तलाठी पवार यांनी एक हजार रुपयांची लाच स्वीकारताच त्यास बेड्या ठोकण्यात आल्या. विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक स्वाती पवार, हवालदार शरद हेंबाडे, युवराज खांडवी व विनोद पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!