पावणेतीन कोटींचा मुद्देमाल केला मुळ मालकांना परत
नाशिक (प्रतिनिधी): पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर परिसरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या मालमत्ताविषयक गुन्ह्यांची उकल करण्याच्या सूचना केल्या होत्या. गुन्हे शाखा विभाग एक आणि दोनचे अधिकारी, कर्मचाºयांनी अनेक गुन्हे उघडकीस आणले. त्याअंतर्गत संशयितांकडून एक कोटी, ६७ लाख, ५३ हजार ६६९ रुपयांचे सोन्याचे दागिने, ४८ लाख ५६ हजार ५३० रुपये रोख, ११ लाख, ८७ हजार, ५०० रुपयांच्या दुचाकी, २३ लाख, ७० हजार रुपयांच्या मोटारी, २९ लाख, २५ हजार ९०० रुपयांचे भ्रमणध्वनी आणि सात लाख, ३३ हजार ५०० रुपयांच्या इतर मौल्यवान वस्तू असा दोन कोटी, ८८ लाख, २७ हजार ९९ रुपयांचा मुद्देमाल परत मिळवला. न्यायालयाच्या आदेशाने तसेच भारतीय नागरी सुरक्षा संहितेप्रमाणे बुधवारी समारंभपूर्वक तक्रारदारांना मुद्देमाल परत करण्यात आला. याआधी नऊ वेळा मुद्देमाल वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला असून, त्यामध्ये १२ कोटी, दोन लाख, २८ हजार ४९८ रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना देण्यात आला आहे.
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते बुधवारी (दि. ८) विविध गुन्ह्यांचा तपास करुन जप्त केलेला मुद्देमाल मुळमालकांना परत करण्यात आला. यात तब्बल पावणेतीन कोटी रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. या सोहळ्यात २१४ तक्रारदारांनी पोलीसांचे आभार मानले.
