थंडीचा तडाखा; जागोजागी पेटताय शेकोट्या
नाशिक : मागील आठवड्यापासून हवेत गारठा निर्माण झाला असून, हळूहळू थंडी वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागातही थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे वापरण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटत असल्याचे चित्र आहे. मात्र, या शेकोट्यांवर ‘कोण होणार मुख्यमंत्री’ आणि ‘कोण होणार मंत्री’ याच्यात चर्चा रंगू लागल्या आहेत.
शहरातील किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत आहे. थंडीचा कडाका वाढू लागल्याने लोकांनी शेकोट्यांचा आधार घेतला आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी, तसेच सकाळी खेडोपाड्यात थंडीपासून बचावासाठी शेकोट्या पेटत आहेत. दरम्यान, राजाच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून लवकरच महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. मात्र, कोणाचा मुख्यमंत्री होणार ? हे कोडे अद्याप सुटलेले नसून स्थानिक पातळीवरही याच चर्चा रंगताना सर्वत्र बघायला मिळत आहे. थंडीमुळे ठीक ठिकाणी पेटत असलेल्या शेकोट्यांवर गप्पांचा फड रंगत असून यामध्ये जास्त करून राजकीय चर्चाच होताना दिसत आहे. राज्यात झालेली झालेल्या निवडणुकींवरच या शेकोट्यांमध्ये चर्चा होत असून कोणाला मंत्रीपद मिळणार आणि कोणाला डावलले जाणार अशाच चर्चा यावेळी होत आहे. यावेळी अनेकांच्या पैंजा देखील लागत असून एकमेकांमध्ये बाचाबाची ही होतानाही दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सिन्नर तालुक्याला मंत्रिपद मिळणार का? याबाबतदेखील चर्चा रंगत आहेत.