नाशिक (प्रतिनिधी): आडगाव शिवारातील हनुमान आणि श्रीरामनगर भागात भरदिवसा दोन घरफोड्या झाल्या. या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे अडीच लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला असून यात रोकडसह दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस दप्तरी वेगवेगळी नोंद करण्यात आली आहे.
पहिल्या घरफोडीबाबत गितांजली लक्ष्मण पगारे (रा. श्रीरामनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पगारे कुटुंबीय सोमवारी (दि.२५) सकाळी घराबाहेर पडले असताना ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजा उघडून चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेल्या रोकडसह सोने-चांदीचे दागिने असा सुमारे २८ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
दुसरी घटनेबाबत भास्कर दामू कांबरी (रा. हनुमाननगर) यांनी फिर्याद दिली आहे. कांबरी कुटुंबीय बुधवारी (दि.२७) घराबाहेर पडले असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरफोडी केली. चोरट्यांनी कपाटात ठेवलेली ११ हजाराची रोकड व सोने-चांदीचे दागिने असा सुमारे २ लाख १७ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला.