नाशिककर अलर्ट: शहराचा पाणीपुरवठा शनिवारी बंद

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक स्मार्ट सिटी कंपनी, तसेच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत मनपाची विविध जलशुद्धीकरण केंद्रे, विविध बुस्टर पंपिंग स्टेशन्स या ठिकाणी, तसेच जलकुंभांच्या ठिकाणी फ्लोमीटर्स, व्हॉल्व्ह्स बसविण्याची कामे हाती घेण्यात येणार असल्याने शनिवारी (दि. ३०) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा खंडित ठेवण्यात येणार असून, रविवारी (दि. १) कमी दाबाने पुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र याठिकाणी एचटी पोल शिफ्ट करणे, गांधी नगर जलशुद्धीकरण केंद्र येथे फ्लोमीटर बसविणे, नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्राच्या विविध ठिकाणी फ्लोमीटर व व्हॉल्व्ह बसविणे, शिवाजी नगर जलशुद्धीकरण केंद्रात विविध ठिकाणी फ्लोमीटर बसविणे, बुस्टर पंपिंग स्टेशन येथे विविध ठिकाणी फ्लोमीटर बसविणे, सातपूर विभागातील ९०० मि.मी. फीडर पाइपलाइनवरील जलकुंभावर व्हॉल्व्ह व वॉटर मीटर बसविणे, प्रभाग क्र. १० मधील भारत गॅस एजन्सीसमोर अशोक नगर येथे ९०० मि.मी. डीआय पाइपलाइनवरील पाणी गळती बंद करणे, गोविंद नगर जॉगिंग ट्रॅक येथील रॉ वॉटर पाइपलाइन पाणी गळती बंद करणे व पाथर्डी फाटा येथील ६०० मिमी व्हॉल्व्ह दुरुस्ती करणे, स्मार्ट सिटी कंपनीमार्फत वासन नगर एफ, राणीनगर, पाथर्डी फाटा जीएसआर येथील पाइपलाइनवर व्हॉल्व्ह बसविणे व इतर अनुषंगिक कामे करणे, नाशिकरोड विभागातील उपनगर इच्छामणी मंगल कार्यालयाजवळ संजय गांधी नगर रॉ वॉटर पाइपलाइन लिकेज बंद करणे, अशा विविध स्वरूपाच्या कामांकरिता दि. ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत शटडाउन घेण्यात येणार असल्यामुळे शनिवारी संपूर्ण नाशिक शहरास पाणीपुरवठा करणे शक्य होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!