जुने नाशिक (प्रतिनीधी): मुस्लीम धर्मात मुख्य पाच अनिवार्य कर्तव्ये आहेत. यात अल्लाह व त्याचे प्रेषित मोहम्मद यांच्याविषयी श्रद्धा, नमाज, रोजा, जकात व हज यांचा समावेश आहे. पैकी हज हे कर्तव्य ज्यांची कुवत आहे, अशांसाठी आहे. या कर्तव्यात मक्का येथे जाऊन ‘खान-ए-काबा’चे दर्शन घेणे, तसेच अराफात व मुजदलिफा या ऐतिहासिक ठिकाणांचे दर्शन घेणे यांचा समावेश आहे. मुस्लीम बांधवांची बकरी ईद अर्थात ‘ईद-उल जुहा’ सोमवारी ( दि. १७) साजरी होत आहे. यानिमित्त सकाळी ९.४५ वाजता ईदगाह मैदानावर खतीब-ए-शहर हाफीज हिसामुद्दीन अशरफी खतीब यांच्या नेतृत्वाखाली पारंपरिक पद्धतीने सामूहिक नमाजपठण होणार आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मनपाचया वतीने ईदगाह मैदानावर स्वच्छता करून खडी टाकण्यात आली आहे.
याबरोबरच अल्लाहच्या मार्गात बकरी किंवा उंटाचे बलिदान देणे याचा अंतर्भाव आहे. इस्लामचे आद्य प्रेषित हजरत इब्राहिम हे अल्लाहचे निस्सीम भक्त होते. अल्लाहच्या मार्गात त्यांनी आपली सर्व संपत्ती व परिवाराचा त्याग केला. त्या गोष्टीचे स्मरण सर्व मुस्लीम बांधवांच्या अंगी बाणविण्याकरिता ‘ईद-उल-जुहा’ साजरी केली जाते. बकरी ईदच्या निमित्ताने शहरातील सुन्नी मरकजी सिरत समितीच्या वतीने खतीब-ए-शहर यांनी सर्व कायदे व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कुर्बानी करताना कुठल्याही कायद्याचा भंग होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ईदच्या नमाजपठणाची तयारी पूर्ण झाली असून, कुर्बानीसाठी बोकड खरेदीही झाली आहे. ईदनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण आहे.
