सटाणा (प्रतिनिधी): लोकशाही वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांनी महत्त्वाचे योगदान दिले. देशात सध्या नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पाठबळावर भाजपचे अस्थिर सरकार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता खेचून आणणे हे आपले प्राथमिक उद्दिष्ट्य असून येत्या तीन महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बागलाण तालुक्यासह नाशिक व धुळे जिल्ह्यात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येकाने जोमाने कामाला लागावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये माजी मंत्री हेमंत देशमुख, धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉ.शोभाताई बच्छाव, नाशिकचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या व माजी आमदार दीपिका चव्हाण व माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शरद पवार
यांची भेट घेतली. यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, देशात आणि राज्यातील जनतेमध्ये भाजप विरोधी लाट असल्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसला. त्यामुळे भाजपला २४० जागांवर समाधान मानावे लागले, तर राज्यात महाविकास आघाडीला ३१ जागांवर यश मिळाले. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील कार्यकर्त्यांनी निवडणुकीत अत्यंत प्रामाणिक काम केल्याचे हे फलित आहे. येत्या तीन महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होणार असून त्यासाठी आपण महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढणार आहोत. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करणे हे आमचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी विधानसभेत सर्वसामान्य शेतकरी आणि जनतेच्या हिताची प्रश्ने मांडून ती सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत धनशक्तीच्या जोरामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. लोकसभा निवडणुकीत बागलाण तालुक्यात भाजपचे मताधिक्य कमी झाले असले तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून तालुक्यात येत्या विधानसभा निवडणुकीत दीपिका चव्हाण यांना मताधिक्क्य वाढणे गरजेचे आहे. बागलाणसह धुळे व नाशिक जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी नवनिर्वाचित खासदार, तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.
यावेळी पवार यांनी धुळे व नाशिक लोकसभेच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला व त्यानुसार येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार शिरीष कोतवाल, धुळे जिल्हाध्यक्ष शाम सनेर, प्रांतिक सदस्य यशवंत अहिरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे, शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे, कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ, डॉ.दिनेश बच्छाव, डॉ.विठ्ठल येवलकर, तालुका कार्याध्यक्ष संजय पवार, शरद आहेर, रायुकाँचे मुन्ना मांडवडे, नितीन सोनवणे, आनंद सोनवणे, बी.टी.भदाणे, दिलीप पाटील, डॉ.मयुरी बच्छाव, प्रज्ज्वल भामरे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
