कुंभमेळ्यात स्नान करणे ही शेकडो वर्षांपासूनची श्रद्धा : ना. गिरीश महाजन

नाशिक (प्रतिनिधी): कुंभमेळ्यात स्नान करणे, ही अंधश्रद्धा नव्हे, तर शेकडो वर्षांपासूनची श्रद्धा व परंपरा आहे. यामागे पंचांग, तर्कवितर्क असून, त्यास धार्मिक आणि वैज्ञानिक आधार आहे. एकावेळी लाखो भाविक स्नान करीत असल्याने पाणी प्रदूषित होते, असे मानण्याचे कारण नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मत वेगळे असू शकते.
गोदावरीत दूषित पाणी येते, ही वस्तुस्थिती आहे; परंतु पाणी शुद्ध करण्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत, असे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी स्पष्ट केले. सिंहस्थ नियोजनाची आढावा बैठक घेण्याकरिता महाजन नाशिक दौ-यावर आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘देशात एक नदी स्वच्छ नाही आणि आम्ही नदीला माता म्हणतो, परदेशात नदीला माता वगैरे काही म्हणत नाही; परंतु तरी तेथील नद्या स्वच्छ असतात. गंगा साफ होणार, हे आम्ही राजीव गांधींच्या काळापासून ऐकत आहोत; परंतु तसे होत नाही. त्यामुळे श्रद्धा -अंधश्रद्धांमधून लोकांनी बाहेर यायला हवे, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी पिंपरी-चिंचवडमध्ये केले. त्यावर महाजन बोलत होते. जिल्ह्याला पालकमंत्री नाही म्हणून सिंहस्थ तयारीचा खोळंबा होतोय, असे मानण्याचे कारण नाही. सिंहस्थाची तयारी वेगाने सुरू असून, सर्व कामांचा क्रम ठरला आहे. कुठल्याही कामांना उशीर होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!