नाशिक (प्रतिनिधी): शहरात पावसाळ्याच्या तोंडावर विविध साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, शहरात व्यवसायानिमित्त आलेल्या तीन परप्रांतीय नागरिकांना मलेरियाची लागण झाल्याचे समोर आले आहे, तर दुसरीकडे जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात शहरात डेंग्यूचे ६० रुग्ण वाढले आहे. यामुळे डेंग्यूचा धोका वाढला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात १६४ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत.
नाशिक शहरात स्वाइन फ्लू डेंग्यूपाठोपाठ आता मलेरियाचेही रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. परप्रांतीय तीन नागरिकांना मलेरिया झाल्याचे आढळून आले असून, यात नाशिक पश्चिम, सातपूर आणि नाशिकरोड येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. या तिन्ही रुग्णांवर उपचार होऊन त्यांची प्रकृती पूर्णपणे सुधारली आहे. शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने वैद्यकीय विभागाची चिंता वाढली आहे. गोविंदनगरमधील एका ५० वर्षीय पुरुषाचा तापाने मृत्यू झाला. संबंधित रुग्णाची नोंद मनपाकडे डेंग्यू संशयित अशी होती. त्यात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यामुळे मनपाचा आरोग्य वैद्यकीय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. मे महिन्यात डेंग्यूचे शहरात ३९ रुग्ण आढळून आले होते. जून महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांत १६८ संशयित रुग्ण आढळले आहेत. यापैकी ६० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये, यासाठी मनपाने ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून जनजागृती हाती घेतली आहे, तसेच डेंग्यूच्या डासांची उत्पत्तीस्थाने शोधून नागरिकांवर कारवाई केली जात आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होणार असल्याचा दावा वैद्यकीय विभागाने केला आहे.
