३४२ तक्रारी आजूनही प्रलंबित; शासनासह मनपाकडील तक्रारींचा होईना निपटारा

आयुक्तांनी दिले २७ जूनपर्यंत निपटारा करण्याचे निर्देश

नाशिक (प्रतिनिधी): राज्य शासनाकडे आनलाईन स्वरूपात नागरिकांकडून विविध बाबींविषयी तक्रारी केल्या जातात. त्यामुळे प्रशासकीयदृष्ट्या संबंधित तक्रारींचे निराकरण वेळेत होणे आवश्यक आहे. परंतु, तक्रारींचा निपटारा कमी आणि प्रलंबित संख्येत भरच पडत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे महापालिकेत एकूण १८३ तक्रारी प्रलंबित असून, शासनाकडे १५९ तक्रारी प्रलंबित आहेत. या तक्रारींचा दि. २७ जूनपर्यंत निपटारा करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.
महापालिकेमार्फत शहरवासीयांना विविध स्वरूपाच्या मूलभूत आणि पायाभूत सेवा सुविधा पुरविल्या जातात. या सेवा पुरविताना अनेकदा महापालिकेची यंत्रणा प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी, अडचणी सोडविण्याकरिता महापालिकेने आॅनलाइन सेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार एनएमसी ई-कनेक्ट हे अ‍ॅप मनपाने उपलब्ध करून देत नागरिकांची सोय करून दिली. अ‍ॅपवर प्राप्त झालेल्या तक्रारी स्वयंचलित पद्धतीने महापालिकेच्या ४९ विभागांकडे आपोआप वर्ग होतात. तक्रारींचे निराकरण करण्यासाठी अ‍ॅपमध्ये आठ दिवसांची मुदत दिली जाते. आठ दिवसांत तक्रारींचा निपटारा न झाल्यास संबंधित विभाग प्रमुखांना स्वयंचलित पद्धतीने नोटीस प्राप्त होते.
या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होतात; मात्र त्यांचे निराकरण तत्काळ होत नसल्याने त्या प्रलंबित राहण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेशी संबंधित १८३ तक्रारी प्रलंबित आहेत. या तक्रारींमध्ये नगरनियोजन व त्या खालोखाल अतिक्रमण विभागाशी संबंधित अधिक तक्रारींचा समावेश आहे. यासंदर्भात आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेत दि. २७ जूनपर्यंत प्रलंबित तक्रारींचा निपटारा करण्याची सूचना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!