नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यातून अवैध दारू वाहतूकीबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होत असते. त्याचबरोबर स्थानिक पोलिसांच्या मदतीने देखील वेगवेगळी कारवाई सुरूच असते. तरीही जिल्ह्यातून सुरू राहणारी अवैध दारू वाहतूक ही काही बंद होत नाही. या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने भरारी पथके तयार करण्यात आली असून अशाच भरारी पथकाचा अपघात झाल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास हिट अँण्ड रनची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड-लासलगाव रस्त्यावर दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. या दृष्टीने सीमा शुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीने संयुक्त कार्यवाही करण्यासाठी सीमा शुल्क विभागाच्या वाहनात पाठलाग करत असताना सीमा शुल्क विभागाचे वाहन हरणूल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले. यात सीमा शुल्क विभागाचे चालक कैलास गेणू कसबे, (वय:51) रा. ध्रवनगर, नाशिक हे जागीच ठार झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे व निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे. या घटनेचा पोलीसाकडुन कसून तपास सुरु आहे. लवकरच याबाबत माहिती दिली जाईल, असे पोलिस अधिकारी यांच्यावतीने सांगण्यात आले.
