नाशिक (प्रतिनिधी): तब्बल आठ दिवसांपासून नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्याकडे पाठ फिरविलेल्या पावसाने सोमवारी ठिकठिकाणी हलक्या स्वरूपात का होईना हजेरी लावली. शहरात सोमवारी (दि.२२) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत १७.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातही रिमझिम पावसावरच शेतकºयांना समाधान मानावे लागत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामाला जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
नाशिक शहरात रविवारी रात्री रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सोमवारी संपूर्ण दिवसभर हलका पाऊस अधूनमधून कोसळतच होता. जिल्ह्यातही विविध भागांत हलक्या पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात झालेल्या या पावसामध्ये मात्र पाहिजे तसा जोर नव्हता. दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे शहरवासीयांचे जनजीवन विस्कळीत झाले. दुपारनंतर पावसाचा काहीसा जोर वाढल्यामुळे शहराच्या विविध भागातील उंच सखल ठिकाणी पाण्याचे डबके साचल्याचे दिसून आले. सोमवारी दिवसभर सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे नागरिकांना रेनकोट व छत्रीचा आधार घेऊनच दिवस काढावा लागला.
जिल्ह्यातही हलक्या पावसाच्या सरी कोसळत असून, त्यामध्ये पाहिजे तसा जोर मात्र नाही. असे असले तरी या पावसाचा खरिपाच्या पिकांना काहीसा लाभ होणार आहे. मात्र, खरीप हंगामासाठी शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत कायम आहे.
