गणेशमूर्ती विक्रीसाठी महापालिकेने ४६९ स्टॉल्सची जागा केली निश्चित; २०ऑगस्टला लिलाव

नाशिक (प्रतिनीधी): मनपा मुख्यालयात लिलाव प्रक्रियेसाठी होणारी गर्दी पाहता प्रशासनाने यंदा लिलाव प्रक्रियेचे विकेंद्रीकरण केल्याने आता स्टॉल्सच्या जागांचे लिलाव संबंधित विभागीय कार्यालयांमध्ये होणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. त्याअनुषंगाने गणेशमूर्ती विक्री करण्यासाठी महापालिकेने आपल्या सहाही विभागांमध्ये २२ ठिकाणी ४६९ स्टॉल्सच्या जागा निश्चित केल्या असून, दि.२० आॉगस्ट रोजी या स्टॉल्सच्या जागांचा लिलाव केला जाणार आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी महापालिकेने स्टॉल्सच्या लिलाव प्रक्रियेचे विकेंद्रीकरण केले. यंदाही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात गणेशोत्सव दिमाखात साजरा होणार असल्याने मनपाने आतापासूनच गणेशोत्सवाच्या तयारीचे नियोजन हाती घेतले आहे. यात नाशिक पश्चिम विभागात ६५, नाशिक पूर्वमध्ये १५, नाशिकरोड विभागात ३२४, पंचवटीत पाच, सिडको विभागात ४२, तर सातपूर विभागात १८ स्टॉल्सच्या जागांसाठी लिलाव होणार आहेत. नाशिकरोड विभागातील जेलरोड परिसरात नाट्यगृहासाठी आरक्षित असलेल्या जागेवर पूर्वी ५० स्टॉल्स उभारले जात होते. यंदा प्रथमच स्टॉल्सची संख्या २८४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

गणेशमूर्ती स्टॉल्स जागांच्या लिलाव प्रक्रियेत मागील वर्ष मनपाने सहभागी होणाºया विक्रेत्यांकडून महापालिकेने तीन हजार रुपये अनामत रक्कम आकारली होती. यंदा मात्र अनामत रकमेत दोन हजार रुपयांची वाढ केली आहे. आता पाच हजार रुपये अनामत रक्कम लिलावापूर्वी आगाऊ भरावी लागणार आहे. त्याचबरोबर आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, वाहन परवाना, पॅनकार्ड, वीज बिल, बँक पासबुक आदी ओळखपत्र व रहिवास पुराव्याच्या दोन साक्षांकित प्रती सादर कराव्या लागणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!