पंचाळे येथे आजपासून १७७ वा अखंड हरिनाम सप्ताह!

सप्ताहाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती तर मंगळवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट!

सप्ताहास मंगळवारी (दि. १३) मनोज जरांगे पाटील भेट देणार आहेत. याप्रसंगी ते साधुमहंतांचा आशीर्वाद घेऊन भाविकांशी संवाद साधणार आहेत. जरांगे पाटील यांच्या दौ-याबाबत नियोजनासंदर्भात सप्ताह समितीची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, सप्ताह नियोजन समितीचे अध्यक्ष संभाजी जाधव, अरुण थोरात, काका पवार, अण्णासाहेब खाडे, गणेश थोरात, सोमठाण्याचे सरपंच भारत कोकाटे, सिन्नर बाजार समितीचे माजी संचालक परशुराम कथले, शिवाजी तळेकर, प्रभाकर बेलोटे, राजेंद्र डुंबरे उपस्थित होते.
सिन्नर (प्रतिनिधी) : श्री संत गंगागिरीजी महाराज गोदावरी धाम सरला बेटाच्या वतीने पंचाळे येथे आयोजित १७७ व्या अखंड हरिनाम सप्ताहास शनिवारी (दि. १०) प्रारंभ होणार आहे. सकाळी १० वाजता गावातून सवाद्य मिरवणुकीने सप्ताह सुरू होणार असून, सप्ताहाची तयारी पूर्ण झाली आहे. या फिरत्या नारळी सप्ताहाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
सद्गुरू गंगागिरीजी महाराज गोदावरी धाम सरला बेटाच्या सप्ताहाची गिनीज बुक आॅफ रेकॉर्डमध्ये वारक-यांचा महाकुंभ म्हणून नोंद झाली आहे. पंचाळे येथील सप्ताहाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दि. २४ जुलै रोजी सप्ताहाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर एकादशीच्या दिवशी पुणतांबा येथे सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज मधुकर महाराज यांच्या हस्ते सप्ताह आयोजन समिती पदाधिका-यांना नारळ देण्यात आले. सप्ताह कालावधीत अखंड भजन मंडपात अखंड भजन व पहारा सुरू राहणार आहे. तीन तासांचा एक पहारा याप्रमाणे दिवसा चार व रात्री चार असा अखंड पहारा भजन मंडपामध्ये सुरू राहणार आहे. यामध्ये नाशिक, संभाजीनगर, नगर जिल्ह्यातील १० हजार टाळकरी भाविकांनी नोंदणी केली आहे.
सप्ताहात शुक्रवारी (दि. १६) दुपारी २ वाजता रामगिरी महाराज यांचे कीर्तन होणार आहे. यानंतर ५०० पोते साबुदाणे, २५० पोते शेंगदाणे, ३०० क्विंटल बटाटा अशा खिचडीचा महाप्रसाद वाटण्यात येणार आहे. शनिवारी (दि. १७) सप्ताहाची सांगता होणार असून, त्यानिमित्ताने सकाळी १० वाजता महंत रामगिरी महाराज यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर ५०० पोते साखरेची बुंदी, ७०० पोते मुरमु-यांचा महाप्रसाद ३०० ट्रॅक्टर्सद्वारे आठ मिनिटांत भाविकांना वाटप केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!