८०४ गावांनी राबवली ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना!p

नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत येणा-या ४० पोलीस ठाण्यांतर्गत दोन हजार ६०७ गणेश मंडळांनी नोंदणी केली असून, त्यातील ८०४ गावांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविण्यात आली आहे. या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंडळानी डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
लाडक्या बाप्पाचे शनिवारी (दि. ७) मोठया उत्साहात आगमन झाले. गावपाड्यापासून ते तालुका स्तरावरील सार्वजनिक मंडळांच्या गणेशोत्सवातील आरास बघण्यासाठी नागरिकांनी पहिल्याच दिवशी मोठी गर्दी केली. या गणेशोत्सवासाठी अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. या उत्सवात उपद्रवींना चाप लावण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड सुरू केली असून, रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह टवाळखोरांवर थेट गुन्हे दाखल केले जात आहेत. यंदा अडीच हजारांहून अधिक मंडळांनी पोलिसांकडे नोंदणी केल्याने मोठ्या फौजफाट्याची तरतूद करण्यात आली असून, कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. सार्वजनिक, खासगी व छोट्या, मोठ्या मंडळांसह मौल्यवान गणपती मंडळांजवळ पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, सर्वच मंडळांना सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गर्दीत भुरट्या चोरांना रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलीस कार्यरत राहणार आहेत. महिलांची छेडछाड रोखण्यासाठी निर्भया, दामिनी पथकांची गर्दीच्या ठिकाणी सतत गस्त राहणार आहे. सालाबादप्रमाणे यंदाही पोलिसांनी डीजे आणि लेझर लाइटमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
असा आहे बंदोबस्त : पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, आठ उपविभागीय अधिकारी(एसडीपीओ), ४० प्रभारी निरीक्षक, तीन हजार पोलीस अंमलदार, एक हजार ५५० होमगार्ड, आरसीपीच्या सहा तुकड्या, एसआरपीएफच्या तीन तुकड्या (९० जवान)
दोन उपविभागीय व १६ प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षक
ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत दरवर्षीप्रमाणे यंदाही ८०४ गावांनी सामूहिक निर्णय घेत एक गाव एक गणपती बसविण्याचा निर्णय घेतला आहे. तर ५८८ मोठ्या व एक हजार १७१ लहान सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपती बसविण्यासाठी पोलिसांची परवानगी घेतली असून, तर ४४ ठिकाणी खासगी मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. गणेशोत्सव साजरा करताना महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण जनजागृतीचे देखावे आणि आरास साकारून समाजप्रबोधन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!