इथेनॉल प्रोजेक्टच्या कर्जाच्या आमिषाने नाशिकच्या दाम्पत्यास तब्बल ९४ लाखांचा गंडा!

नाशिक (प्रतिनिधी): इथेनॉल प्रोजेक्टसाठी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी शहरातील दाम्पत्यास तब्बल ९४ लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. वेगवेगळेबहाणे करून ठकबाजांनी ही रक्कम उकळली असून, वर्ष उलटूनही कर्ज मंजुरी अथवा पैसे पदरात न पडल्याने दाम्पत्याने पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज प्रशांत भावसार (वय ४०, रा. यशवंत हाइट्स, पिंप्राळे, जि. जळगाव), शमा अब्दुल पिंजारी (रा. कुर्ला, मुंबई), किरण चौधरी (रा. दीक्षितवाडी, जळगाव) व विदेशपाल सिद्धू (रा. घाटकोपर, मुंबई) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत रेणुका प्रशांत भावसार (रा. आनंदवल्ली, गंगापूर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. संशयितांनी संगनमत करून आॅक्टोबर २०२३ मध्ये भावसार दाम्पत्याशी संपर्क साधला होता. यावेळी विश्वास संपादन करीत भामट्यांनी संशयित पंकज भावसार याच्या कर्ज फाइल मंजुरीसह भावसार दाम्पत्याच्या इथेनॉल प्रोजेक्टसाठी २०० कोटी रुपयांचे कर्ज मुंबईच्या भारतीय विश्वकर्मा जनहित सेवा समिती ट्रस्टकडून मिळवून देण्याची ग्वाही दिल्याने ही फसवणूक झाली. गेल्या ऑक्टोंबरपासून संशयितांनी कर्ज मंजुरीसाठी वेगवेगळे बहाणे करून भावसार दाम्पत्याकडून सुमारे ९३ लाख ८५ हजार रुपये उकळले. त्यातील काही रकमा रोख स्वरूपात व काही बँक खात्यावर स्वीकारली. मात्र, वर्ष उलटूनही भावसार दाम्पत्याचे कर्ज मंजूर झाले नाही, याबाबत संशयितांशी संपर्क साधला असता त्यांनी टाळाटाळ केल्याने हा प्रकार पोलिसांत पोहोचला असून, अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!