नाशिक (प्रतिनिधी): नाशिक क्रिकेटसाठी आनंदाची व अभिमानाची बातमी. नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील पदार्पणाच्या मालिकेत झंझावाती शतक झळकावलेल्या नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा युवा खेळाडू ,आक्रमक डावखुरा सलामीवीर साहिल पारख याची बीसीसीआयच्या विनू मंकड स्पर्धे साठी, १९ वर्षांखालील वयोगटातील महाराष्ट्र संघाच्या उपकर्णधारपदी निवड झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुदुचेरी येथे झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करतांना साहिल पारखने केवळ ७५ चेंडूत १४ चौकार व तब्बल ५ षटकारांसह नाबाद १०९ धावा फटकावत, भारतीय संघाला केवळ २२ षटकांतच ९ गडी राखून जोरदार विजय मिळवून देत मालिका विजयाला हातभार लावला. १९ वर्षांखालील भारतीय संघात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेत साहिलने ३ सामन्यात सर्वाधिक एकूण १३३ धावा करून फलंदाजीत प्रथम स्थान पटकवले, याचा नाशिककरांना अतिशय आनंद झाला आहे. आजच पुदुचेरी येथे भारतीय संघाने हि एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली. साहिलसह १९ वर्षांखालील भारतीय संघात खेळणारा किरण चोरमळे हा या महाराष्ट्र संघाचा कर्णधार असेल.
युवा साहिल पारखची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन – एम सी ए – तर्फे, नव्या २०२४-२५ हंगामासाठी महाराष्ट्र संघाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या शिबिरासाठी याआधीच निवड झाली आहेच. साहिल पारख २६ एप्रिल ते २२ मे दरम्यान झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – तर्फे आयोजित नॅशनल क्रिकेट अकादमी – एन सी ए – च्या राष्ट्रीय पातळीवरील शिबिरात सहभागी झाला होता. त्यापूर्वीच्या हंगामात देखील १६ वर्षांखालील वयोगटात साहिलची निवड झाली होती . माजी कसोटीपटू व्हि व्हि एस लक्ष्मण प्रमुख असलेल्या एन सी ए, बेंगळुरू तर्फे भारतभरातील उदयोन्मुख , युवा खेळाडूंसाठी हे शिबीर झाले . साहिल पारेखचे शिबिर नाडियाद येथे पार पडले. वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत केलेल्या लक्षणीय कामगिरीच्या जोरावरच १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या संघापाठोपाठ साहिलची यंदा एन सी ए च्या राष्ट्रीय पातळीवरील खास शिबिरासाठी दुसऱ्यांदा निवड झाली होती .
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ – बीसीसीआय – २०२४-२५ ची १९ वर्षांखालील वयोगटासाठीची विनू मंकड स्पर्धा ४ ते १० ऑक्टोबर दरम्यान नियोजित असून कटक येथे होणारे महाराष्ट्र संघाचे साखळी सामने पुढीलप्रमाणे :
४ ऑक्टोबर – कर्नाटक, ६ ऑक्टोबर – आसाम, ८ ऑक्टोबर – बरोडा, १० ऑक्टोबर – बंगाल, १२ ऑक्टोबर – मेघालय.
साहिलच्या महत्वाच्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना व जिल्हा संघात, तसेच जिल्ह्यातील क्रिकेट रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे यांनी साहिलचे अभिनंदन करून आगामी विनू मंकड स्पर्धेतील यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.