आंब्याचीवाडीच्या प्राथमिक शाळेत मेगा फोन भेट
बेलगाव कुऱ्हे : आदिवासी दुर्गम भागात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांच्या सर्वोत्तम कार्यामुळे सुजाण समाजाची नवीन पिढी निर्माण होत आहे. आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी नव्या विचारांची सुसज्ज आणि सुसंस्कृत फौज शिक्षकांच्या योगदानामुळे तयार होत आहे. शिक्षकांच्या व आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी यशाला गवसणी घालण्यासाठी नियमित अभ्यास केल्यास उज्वल भविष्य घडण्यास मोठी मदत मिळेल असे प्रतिपादन विंचूर दळवीचे अध्यात्मिक गुरू हभप सुनील महाराज भोर यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील आंब्याचीवाडी येथील प्राथमिक शाळेत अध्यात्मिक गुरु सुनील महाराज भोर यांनी शाळेची गरज ओळखून मेगा फोन भेट दिला यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मुख्याध्यापक सुनिल सांगळे, शरद शिरसाट ,आई वडील, वंसत सांगळे, कुसुम सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते. नवीन पिढीला योग्य संगतीची खूप गरज आहे. संगतीने जीवनाचे भवितव्य घडले जाते. आणि कुसंगतीने जीवन उद्ध्वस्त होते म्हणून जीवनात चांगली संगत धरा असे हभप भोर महाराज म्हणाले.
