नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेच्या नव्या कार्यकाळातील पहिल्याच महासभेत शहरातील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. सदनिकांवरील वाढीव प्रॉपर्टी टॅक्स (घरपट्टी) शुल्काच्या जादा रक्कमेवर तब्बल ९० ते ९५ टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. या निर्णयाला सभागृहातील सर्व नगरसेवक सदस्यांनी एकमुखी पाठींबा दिला.
महासभेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, पुरुषांच्या नावावर नोंद असलेल्या सदनिकांवरील वाढीव कर रकमेवरील जादा रक्कमेवर ९० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तर महिलांच्या नावावर सदनिका नोंद असल्यास वाढीव रक्कमेवरील जादा शुल्कावर ९५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महिलांच्या नावावर मालमत्ता नोंदणीस प्रोत्साहन देणे आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
महापौरांनी आपल्या निर्णयात नागरिकांना घरपट्टी वेळेत भरण्याचे आवाहन केले. तर त्या पुढे म्हणाल्या “महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत म्हणजे मालमत्ता कर. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, प्रकाशयोजना आदी मूलभूत सेवांसाठी निधीची गरज असते. त्यामुळे नागरिकांनी वाढीव शुल्कावरील सवलतीचा लाभ घेत थकीत कर तत्काळ भरावा,” असे आवाहन त्यांनी केले.
महानगरपालिकेकडे मोठ्या प्रमाणावर घरपट्टी थकबाकी असल्याची माहिती सभागृहात देण्यात आली. वाढीव शुल्कावर सवलत दिल्यामुळे थकबाकीदार नागरिक कर भरण्यास पुढे येतील आणि महसुलात वाढ होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला. यामुळे शहरातील प्रलंबित विकासकामांना गती मिळणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या ठरावावर चर्चा दरम्यान सर्व नगरसेवकांनी सकारात्मक भूमिका घेतली. नागरिकांना दिलासा देत महसूल वाढवण्याचा समतोल निर्णय असल्याचे मत सदस्यांनी व्यक्त केले. अखेरीस हा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. महानगरपालिकेकडून लवकरच सवलतीसाठीची अटी, मुदत आणि भरणा पद्धती जाहीर करण्यात येणार असून नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी महासभेत करण्यात आले आहे.
