नाशिक (प्रतिनिधी): पोलिसाशी हुज्जत घालणे एका तरूणास चांगलेच महागात पडले आहे. न्यायालयाने त्यास दोषी ठरवत दंडासह कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा सुनावली.
सुरेश सुखदेव झनकर (३० रा.रामराज अपा,रामकृष्णनगर अंबडलिंक रोड) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अंमलदार गजाजन पाटील यांनी फिर्याद दिली होती. अंमलदार पाटील २७ मार्च २०१४ रोजी रात्री इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पाथर्डी फाटा भागात अन्य सहका-यांसह नाकाबंदी करीत होते. त्यावेळी विनानंबर असलेल्या दुचाकीवर ट्रिपलसिट प्रवास करणा-या नवनाथ सुरडे, सुभाष झनकर (रा.दोघे घोटी ता.इगतपुरी) व सुरेश झनकर यांना पाटील यांनी हटकले. मात्र ते न जुमानता निघून गेले होते. यानंतर हे तिघे मद्याच्या नशेत परतत असताना पाटील यांनी त्यांना अडविले. दोघा संशयितासह आरोपीने पाटील यांच्याशी हुज्जत घालत अरेरावी केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक निरीक्षक एस.एस.गायकवाड यांनी करून पुराव्यानिशी दोषारोप जिल्हा व सत्र न्यायालयात सादर केले होते. हा खटला कोर्ट क्र.३ चे जिल्हा व सत्र न्यायाधिश पी.एम.बदर यांच्यासमोर चालला. सरकारतर्फे अॅड. अपर्णा पाटील यांनी काम पाहिले. न्यायालयाने आरोपी सुरेश झनकर यास दोषी ठरवत त्यास ५०० रूपये दंड व कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा सुनावली.
