नाशिक (प्रतिनिधी): महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी मनपाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागात अचानक भेट दिली. यावेळी विभागाच्या कामकाजाविषयी नाराजी व्यक्त करून त्यांनी अधिका-यांची चांगलीच खरडपट्टी काढली. शहरातील विविध विकास कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासोबतच कामकाजाविषयी त्यांनी सविस्तर माहिती घेतली. शहरातील रस्त्यांसंदर्भात अनेक तक्रारी प्राप्त होत असल्याने आयुक्तांनी विभागाला धारेवर धरत कामकाजात सुधारण्याचा अल्टिमेटम दिला.
गुणवत्ता नियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी आयुक्तांना विभागाविषयी माहिती दिली. शहरात सुरू असलेल्या स्थापत्यविषयक विविध कामांवर गुणवत्ता नियंत्रण विभाग लक्ष ठेवतो. विविध विकास कामांमध्ये वापरण्यात येणा-या बांधकाम साहित्याच्या नमुन्यांची तपासणी करून मानकांनुसार असल्याची खात्री केली जाते. स्थापत्य कामे गुणवत्तापूर्ण करण्याची जबाबदारी क्षेत्रीय स्तरावरील कर्मचा-यांची असून, अचानक भेट देवून त्या कामांची तपासली केली जाते. काही त्रुटी निदर्शनास आल्यास संबंधित कार्यकारी विभागाला कळविल्या जातात, असे पाटील यांनी सांगितले. कामे टिकाऊ आणि दर्जेदार व्हावी, यादृष्टीने मक्तेदारांनी केलेली कामे जनरल स्पेसिफिकेशननुसार तपासली जातात. आयुक्त मनीषा खत्री यांनी या प्रक्रियेची सविस्तर माहिती घेऊन विभागाच्या कार्यप्रणालीबाबत नितीन पाटील यांना विविध प्रश्न विचारले. पायाभूत कामांच्या गुणवत्तेत तडजोड न करता नागरिकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी हा विभाग कामकाज करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले. आयुक्त मनीषा खत्री यांनी विभागाच्या कामांमधील गुणवत्तेत वाढ करून अधिक कार्यक्षमतेने काम करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.
