राम कुंडात पाणी कमी असल्याने भाविक झाले नाराजी!
मौनी अमावस्येला स्नानासाठी गर्दी होणार हे लक्षात घेऊन नदीला पाणी सोडणे गरजेचे होते. मात्र, कुंडात पाणी कमी असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली. रामकुंडाजवळ असलेल्या वस्त्रांतरगृहाचा वापर करण्याच्या सूचना महिलांना देण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्याचा वापर होत नाही. त्यामुळे स्नानानंतर महिलांना कपडे बदलण्यासाठी योग्य सोय उपलब्ध न झाल्याने महिलांमध्येही नाराजी दिसून आली.
नाशिक (प्रतिनिधी): प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यास जाणे शक्य झाले नाही, म्हणून रामकुंडात स्नानाची पर्वणी साधली, अशी भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली. मौनी अमावस्येच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. २९) पंचवटीतील रामकुंडावर स्नानासाठी भाविकांनी गर्दी केली होती. स्नानानंतर भाविक मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी जात असल्याने पंचवटी परिसर पहाटेपासूनच भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
मौनी अमावस्येच्या पर्वकाळात केलेल्या स्नानाने पुण्यफल प्राप्त होत असल्याच्या भावनेने या स्नानाचे महत्त्व लक्षात घेऊन भाविकांनी स्नानास गर्दी केली होती. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांप्रमाणेच स्थानिकांनीही स्नान आणि दर्शनासाठी रामकुंड आणि मंदिरांमध्ये हजेरी लावली. बुधवारी आठवडे बाजार असल्याने वाहने उभी करण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे लांबवर वाहने पार्क करून भाविक पायी रामकुंडावर येत होते. पहाटेपासूनच सुरू झालेला ओघ सकाळी वाढू लागल्याने पोलिसांनी रामकुंडाकडे येणारे मार्ग बॅरिकेड्स लावून वाहनांसाठी बंद केले. त्यामुळे येथील गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोयीचे झाले.
