गंगापूर धरण भरलेले असतानाही प्रभाग २८ तहानलेलाच!

शुभम पार्कसह सिडको परिसरात तीव्र पाणीटंचाई; नागरिकांचा मनपाविरोधात संताप

एकीकडे गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना दुसरीकडे शहरातील नागरिक पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येत असल्याने, नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नव्याने निवडून आलेले नगरसेवक आणि मनपा प्रशासन या पाणीप्रश्नी किती लवकर व प्रभावी उपाययोजना करतात, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून कामटवाडे व अंबड लिंकरोड परिसरातील नागरिक पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत. पावसाळ्यात गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असतानाही सिडकोतील प्रभाग क्रमांक २८ मधील अनेक भागांत नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने आणि मूलभूत सुविधा न मिळाल्याने मनपाविरोधात नागरिकांचा आक्रोश वाढत चालला आहे. प्रभाग २८ मधील शुभम पार्क परिसरातील तब्बल १२ इमारतींसह मुक्ताई कॉलनी, गंगा शकुन, गजानन रो-हाउस, उमा पार्क, बंधावणेनगर, डी.जी.पी. नगर-२ या भागांत गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा अनियमित व अपुरा आहे. अनेकदा सकाळी किंवा रात्री ठराविक वेळेत येणारे पाणी पूर्णपणे बंद असते. कधी अत्यल्प दाबाने, तर कधी आठवड्यातून एक-दोन वेळाच पाणी मिळत असल्याने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे.

पिण्याचे पाणी, स्वयंपाक, स्वच्छता यांसारख्या मूलभूत गरजांसाठी नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. टँकरच्या वाढत्या खर्चामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक भुर्दंड पडत असून, मध्यमवर्गीय व गरीब कुटुंबांची अवस्था बिकट झाली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र आहे. या भागातील नागरिक नियमितपणे घरपट्टी व पाणीपट्टी भरत असतानाही मूलभूत सुविधा न मिळाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी नागरिकांनी अनेक वेळा नाशिक महानगरपालिकेकडे तक्रारी, निवेदने तसेच प्रत्यक्ष भेटी घेतल्या. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
“धरणे भरलेली असताना आम्हाला पाणी का नाही?” असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी मनपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २८ मधून भाजपच्या प्रतिभा पवार व शरद फडोळ, तर शिवसेनेचे दीपक दातीर व सुवर्णा मटाले हे उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणुकीदरम्यान नागरिकांनी पाणीप्रश्नी मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. मात्र पदग्रहणाआधीच पाणीप्रश्न चिघळल्याने, नव्या नगरसेवकांसमोर हे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

पाणीटंचाईबाबत नव्या नगरसेवकांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे.

“मनपाने प्रभाग २८ मधील शुभम पार्क परिसरासह मुक्ताई कॉलनी, गंगा शकुन, गजानन रो-हाउस, उमा पार्क व बंधावणेनगर या भागांत तातडीने पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर नागरिकांसह आंदोलन छेडले जाईल.”

प्रतिभा पवार, नगरसेविका (भाजपा)

“पाणीप्रश्न हा कायमचाच बनला आहे. शुभम पार्कसह परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी मनपा आयुक्त व संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने भेट घेऊन ठोस उपाययोजना राबवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”
दीपक दातीर, नगरसेवक (शिंदे शिवसेना)

आतापर्यंत नागरिकांच्या मागणीनुसार टँकर पुरवठा करून तात्पुरता दिलासा दिला. मात्र हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जाणार. असे न झाल्यास मनपा आयुक्तांना जाब विचारत नाशिक मनपा कार्यालयात महिला हंडा मोर्चासह धरणातील पाणी आणून टँकर खाली करोआंदोलन करण्यात येईल.
शरद फडोळ, नगरसेवक (भाजपा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!