नाशिक (प्रतिनिधी): शहर परिसरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसागणिक गुंतागुंतीचा होत असताना शहराच्या मध्यवर्ती भागातील बाजारपेठेत खरेदीसह इतर कामानिमित्त येणा-या वाहनचालकांच्या बेशिस्तपणाचा फटका अन्य लोकांना बसतो. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाच्यावतीने कुठेही उभे करण्यात येणा-या वाहनांविरुद्ध कारवाईला (टोईंग) सुरूवात झाली आहे. नाशिकरोड विभाग वगळता शहरात टोईंग कारवाईला गुरुवार (दि. ६) पासून प्रारंभ झाला. बेशिस्तपणे पार्क केलेली वाहने उचलून नेत वाहतूक शाखेने पहिल्याच दिवशी २१ वाहनधारकांना झटका देत ९ हजार ७२० रुपयांचा दंड वसूल केला. त्यात १८ दुचाकी व तीन चारचाकी वाहनांचा समावेश आहे. सोमवार (दि. १०) पासून मोहीम तीव्र करण्यात येणार आहे.
शहरातील मध्यवर्ती बसस्थानक, न्यायालय परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय, मेहेर चौक यासह पंचवटी, गंगापूर रोड अशा मध्यवर्ती परिसरात काही कामानिमित्त तसेच मेनरोड बाजारपेठेत खरेदीसाठी येणाºयांची संख्या कमी नाही. जा-ये करण्याचा वेळ वाचावा, यासाठी काहीजण वाहने थेट आपल्या कामाच्या ठिकाणी आणतात. त्या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था नसली तरी मिळेल त्या मोकळ्या जागेत वाहने उभी करण्यात येतात. यामुळे वाहतूक खोळंबा होतो. वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अस्ताव्यस्त पध्दतीने रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने वर्दळीच्या ठिकाणी अडथळा ठरतात. या पार्श्वभूमीवर बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने टोईंग कारवाई सुरू करण्यात आली आहे. कारवाईत दंडाची रक्कम दुप्पट केल्याने वाहनचालकांना आर्थिक झळ सहन करावी लागणार आहे.
