- आगामी कुंभमेळ्या आधी ‘प्रसाद’ योजनेचे कामकाज पूर्ण करण्याची खासदार वाजे यांची मागणी
- रखडलेला निधी तात्काळ उपलब्ध करून देण्याचे केले आवाहन
नाशिक (प्रतिनिधी): खासदार राजाभाऊ वाजे यांनी त्रंबकेश्वर मंदिर आणि संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या “प्रसाद” योजनेच्या माध्यमातून होत असलेल्या विकासाबाबत तसेच रखडलेल्या निधी बाबत संसदेत प्रश्न उपस्थित केलाय. मात्र निधी मिळणार का याकडे सर्व त्र्यंबकेश्वर येथील भक्तांचे लक्ष लागुन आहे.
त्रंबकेश्वर येथील विविध धार्मिक स्थळांचा पर्यटन वाढीच्या अनुषंगाने विकास व्हावा, यासह वारकरी संप्रदायातील अतिशय महत्वाचे धार्मिक केंद्र असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधी मंदिराचा व परिसराचा विकास व्हावा या अनुषंगाने २०१८ साली केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून राबवली जाणारी महत्वाकांक्षी अशी प्रसाद म्हणजे तीर्थयात्रा पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक वृद्धिंगत मोहीम या योजनेच्या माध्यमातून तब्बल ४५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली. यामाध्यमातून केलं जाणारे काम अत्यंत संथ गतीने होत असून त्यासाठीचा निधी देखील रखडला आहे. याबाबत खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करत कुंभमेळ्याच्या आधी विकासकाम पूर्ण होऊन नव्याने याठिकाणी विकासकामे मंजूर करावी अशी मागणी केली आहे.
