नाशिक (प्रतिनिधी): २०२६-२७ मध्ये त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा पार पडत आहे. सिंहस्थाच्या अनुषंगाने त्र्यंबकेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी एक हजार १३८ कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यामध्ये २४९ कोटी रुपये खर्च करून कायमस्वरूपी दर्शनपथाची उभारणी केली जाणार आहे. त्र्यंबकेश्वर येथे साकारण्यात येणा-या दर्शनपथासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने प्रकल्पाच्या जमीन संपादनासाठी सध्याच्या आरक्षणात बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापासून हा पथ सुरू होणार असून, त्र्यंबकेश्वर मंदिर पूर्व दरवाजा ते शनीमारुती मंदिरापावेतो प्रस्तावित आहे. प्रकल्पासाठी सध्या आरक्षित केलेली प्राथमिक शाळा, खेळाचे मैदान, मुलींच्या शाळेची बंद पडलेली व मोडकळीस आलेली इमारत व अन्य काही क्षेत्राचे भूसंपादन करावे लागणार आहे. नगरपरिषदेच्या १९ मार्च रोजीच्या विशेष सभेत ठराव करीत, दर्शनपथासाठी आवश्यक जागा आरक्षणातून वगळण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्याच्या सफाई कर्मचा-यांच्या वसाहतीचे नूतनीकरण देखील केले जाणार आहे. त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेने आता विशेष सभेत आरक्षण बदलाच्या प्रस्तावावर हरकती व सूचना मागविल्या आहेत. त्यासाठी महिनाभराचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर शासनास प्रस्ताव सादर करण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. यानिमित्ताने दर्शनपथ प्रकल्पाच्या उभारणीसाठी प्रशासनाने आणखी एक सकारात्मक पाऊल पुढे टाकले आहे.
सध्या तीन सेकंदांत एक भाविक दर्शन घेऊन बाहेर पडतो. या हिशेबाने मंदिर दररोज १५ तास खुले ठेवले, तर दिवसभरात १५ हजार भाविक दर्शन घेतील. मात्र, सिंहस्थ कुंभमेळ्यात येणा-या भाविकांची संख्या विचारात घेता ही सुविधा अपुरी पडेल. ही बाब लक्षात घेत शासनाने त्र्यंबकेश्वरला धार्मिक कॉरीडॉर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये दररोज सुमारे ३० ते ३५ हजार भाविक येतात. सुटीच्या कालावधीतील ही संख्या जवळपास ६० हजारांवर पोहोचते. त्यामुळे येथे सुविधा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. दर्शनपथ प्रकल्पामुळे १० हजार भाविक एकावेळी दर्शन रांगेत उभे राहू शकतील. सध्या ही क्षमता तीन हजार आहे.
