नाशिक (प्रतिनिधी): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी नाशिक महानगरपालिकेने तयार केलेल्या प्रस्तावात जी कामे तात्काळ करणे आवश्यक आहे, त्या कामांचा प्राधान्यक्रम ठरविणे गरजेचे आहे. सरसकट सर्वच कामांसाठी निधी उपलब्ध होणे शक्य नाही. अजून सिंहस्थासाठी तीन वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. त्यामुळे महापालिकेने विभागनिहाय जी कामे प्रस्तावित केली आहेत, त्यांचा प्राधान्यक्रम ठरवावा. निधीच्या उपलब्धतेनुसार काही कामे पुढे घेऊन जाता येतील, असे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सोमवारी (दि. ८) स्पष्ट केले.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. प्रवीण गेडाम यांनी महापालिकेकडून सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीत महापालिकेच्या वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्यांनी तयार केलेल्या प्रस्तावांची माहिती घेऊन त्याबाबत सूचना करण्यात आल्या. सिंहस्थाच्या कामांचे नियोजन करताना वेगवेगळ्या विभागांच्या यंत्रणांशी समन्वय ठेवण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली. गेल्या कुंभमेळ्याच्या वेळी जलसंपदा विभागाने गोदावरी नदीवर घाट बांधले. या घाटांच्या सुशोभीकरणाची जबाबदारी कोणत्या यंत्रणा पार पाडतील, कोणाकडे कोणती कामे असायला हवीत, याबाबत प्राथमिक चर्चा झाली. साधुग्रामच्या जमिनीचा विषय दर कुंभमेळ्याच्य तोंडावर पुढे येतो. बैठकीत त्याबाबत अनेक सूचना मांडण्यात आल्या.
साधुग्रामसाठी जमिनींची अधिग्रहण करणे किंवा दोन वर्षांसाठी जमिनी भाडेतत्त्वावर घेणे असे दोनच पर्याय प्रशासनापुढे उपलब्ध आहेत. परंतु, हे विषय शासन स्तरावरचे असल्याचे गेडाम यांनी स्पष्ट केले. याबाबत उपलब्ध वेगवेगळ्या पर्यांयांचा अधिका-यांनी अभ्यास करावा. त्यावर सविस्तर चर्चा करावी, असेही गेडाम यांनी सांगितले. रिक्त पदे विशेषत: अभियंत्यांची भरती करण्याबाबत शासनाला विनंती करण्यात येणार आहे. शहरातील दादासाहेब फाळके स्मारक, तारांगण, बोटॅनिकल गार्डन यांसारखा सांस्कृतिक ठेवा असून, तेथे काय करता येऊ शकते, याचा अंदाज यावेळी घेण्यात आला. परंतु, यामध्ये केवळ महापालिकाच नाही, तर वेगवेगळ्या यंत्रणांची मदत घेतली जाणार असल्याचे गेडाम यांनी स्पष्ट केले. दोन-तीन दिवसांनी अन्य विभागांसोबत चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. रिंगरोड कुणी करायचे हा शासन स्तरावरील विषय आहे. गोदावरी संदर्भात आणि स्मार्ट सिटी संदर्भात स्वतंत्र बैठक घेणार असल्याचेही गेडाम म्हणाले.
