नाशिक (प्रतिनिधी): लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रविवारी (दि. १४) उंटवाडी भागात दोघांना रंगेहाथ पकडून त्यांच्या मुसक्या आवळल्या, फिटनेस सर्टिफिकेट देण्याच्या मोबदल्यात ३० हजारांची लाच स्वीकारणा-या दोन वैद्यकीय अधिका-यांना न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. संशयितांच्या शासकीय घर झडतीत एसीबीच्या हाती फारसे काही लागले नाही. त्यामुळे दोघांच्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी एसीबीने कोठडीची मागणी लावून धरली होती.
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आबिद आबू अत्तार आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत एकनाथ खैरनार अशी एसबीच्या कोठडीत असलेल्या संशयित लाचखोरांची नावे आहेत. या प्रकरणातील तक्रारदाराचा मित्र नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत आहे. शासकीय नियमाप्रमाणे, ज्या कैद्याचे वय ६५ पेक्षा जास्त आहे; तसेच ज्या कैद्याने १४ वर्षे शिक्षा भोगली आहे, अशा कैद्यांना शासनाने नेमून दिलेली समिती मुक्त करते. परंतु, अशा कैद्यांना बाहेर सोडण्यासाठी मुख्य वैद्यकीय अधिका-यांच्या योग्यता प्रमाणपत्राची गरज असते. तक्रारदाराच्या मित्राला हे प्रमाणपत्र हवे होते. नाशिकरोड कारागृहातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आबिद अत्तार (४०) आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरनार यांनी हे प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीत ३० हजार रुपयांत हा व्यवहार निश्चित करण्यात आला होता. याबाबत तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून, उंटवाडी भागातील एका हॉटेल परिसरात दोघांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर तपास पथकाने संशयितांच्या शासकीय निवासस्थानाची झडती घेतली. त्यात डॉ. अत्तार यांच्या घरात सुमारे अडीच लाख, तर डॉ. खैरनार यांच्या घरात सात लाखांचे दागिने व मौल्यवान वस्तू आढळल्या. सोमवारी संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी स्वप्निल राजपूत व सहायक सापळा अधिकारी राजेंद्र सानप यांच्या पथकाने ही कारवाई केली. पथकात हवालदार प्रभाकर गवळी, प्रफुल्ल माळी, संतोष गांगुर्डे, पोलीस नाईक किरण धुळे यांचा समावेश आहे.

