“कष्ट, चिकाटी आणि निष्ठा असल्यास व्यवसायात यश नक्की”: विलास बिरारी
सटाणा (प्रतिनिधी): कुठलाही व्यवसाय करणे माणसाला अशक्य नाही कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या, कष्ट करण्याची तयारी, चिकाटी, सकारात्मक दृष्टिकोन, हार न मानण्याची वृत्ती, कामावर निष्ठा असल्यास व्यवसायात यश नक्की मिळते असे प्रतिपादन महाराष्ट्र बिल्डर असोसिएशनचे माजी अध्यक्ष व हर्ष कंन्ट्रक्शनचे संचालक विलास बिरारी यांनी केले. ते येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर आबासाहेब तथा ना.म. सोनवणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त आयोजित समाजदिन कार्यक्रमात बोलत होते.
संस्थेचे चिटणीस दिलीप दळवी, बागलाण तालुका संचालक प्रसाद सोनवणे, महिला संचलिका शालन सोनवणे, महेश भामरे, राजेंद्र भदाणे, रमेश सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष पांडुरंग सोनवणे, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रल्हाद सोनवणे, भिका सोनवणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय मेधणे व्यासपीठावर उपस्थित होते.
बिरारी पुढे म्हणाले की, कुठल्याही नोक-या मिळवणे कठीण होत चालले आहे. विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा आपला सुरू करावा, भांडवल नाही, अनुभव नाही याचा नकारात्मक विचार न करता स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करावा. इच्छाशक्ती असल्यास सर्व काही साध्य करता येते, हे सांगताना त्यांनी सहा हजार रुपयांपासून सुरू झालेला त्यांचा व्यवसाय 1000 कोटी पर्यंत पोहोचण्या मागचे गमक विद्यार्थ्यांना सांगितले. मराठा विद्या प्रसारक संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करताना ते म्हणाले की, कर्मवीरांनी या संस्थेच्या उभारणीसाठी अतोनात कष्ट घेतले, त्यांच्या त्या बलिदानातून संस्था उभी राहिली, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपणही जीवनात यशस्वी व्हावे तसे झाल्यास संस्थेच्या विकासात आपणास योगदान देता येईल, याची सुरुवात स्वतःपासून करणार असल्याचे सांगून त्यांनी महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम बनवून देण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य विजय मेधणे यांनी महाविद्यालयाच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा परामर्श घेतला तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून महाविद्यालयातील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. प्रा. अनिल पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
गुणवंतांचा सत्कार: यावेळी विविध अभ्यासक्रमात प्रथम आलेल्या ज्योती बागुल (कविवर्य केशव मेश्राम पारितोषिक) सौरभ दशमुखे (विज्ञान शाखा प्रथम), अतुल वसावे (बी.व्होक प्रथम), नूतन देवरे (कला शाखा प्रथम), मुशरा बेग शिरीन पठाण, सुशीला अहिरे, कोमल ह्याळीज (अर्थशास्त्र प्रथम), कल्याणी खैरणार (मराठी प्रथम),चेतना पाटील ( इतिहास प्रथम) ह्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध विषयात केलेल्या संशोधन कार्याबद्दल डॉ. प्रतिभा रौंदळ, प्रा. संदेश गायकवाड, प्रा. तृप्ती काकुळते, प्रा. महादेव आटोळे, डॉ. राजेंद्र वसईत, प्रा. मनोहर गावीत, प्रा. प्रशांत कोळी ह्या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून कर्मवीरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रा. सोनाली गोसावी यांच्या नेतृत्वाखाली संगीत विभागाने समाजगीत सादर केले. यावेळी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य सुभाष सोनवणे, राजेंद्र देवरे, संदीप वाघ, रमेश सोनवणे, हिराजी सोनवणे, अजय सोनवणे, अभिमन सोनवणे, अरुण सोनवणे, अशोक भामरे, नितीन मगर, विठ्ठल सोनवणे, दिलीप सोनवणे, विलास देवरे, नीलिमा आहेर, पत्रकार शशिकांत कापडणीस, अंबादास देवरे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. उपप्राचार्य डॉ. नरेंद्र निकम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर समन्वयक प्रा. सुनीता शेवाळे यांनी आभार मानले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. स्वप्नील शेंडगे, प्रा. तुषार खैरनार, प्रा. भास्कर निकम, प्रा. नानासाहेब निकम यांच्यासह प्राध्यापकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
